मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात आणि १२.५ षटकात मुंबईने हंगामातील पहिला विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने या सामन्यात ९ चेंडूत दमदार फटकेबाजी करत नाबाद २७ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार खेचले.
मुंबईला विजय मिळवून देणाऱ्या खेळीसह सूर्यकुमार यादवने एका मोठा विक्रम रचला. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंच्या विशेष यादीत दिमाखात प्रवेश केला.
सूर्यकुमार यादवने कोलकाता विरूद्ध केलेल्या नाबाद २७ धावांच्या बळावर तो टी२० क्रिकेटमध्ये ८,००० धावांचा टप्पा पार करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला.
भारतीय खेळाडूंच्या या खास यादीत विराट कोहली हा १२,९७६ धावांसह अव्वल स्थानी आहे. तर रोहित शर्मा ११,८५१ धावांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
त्यांच्यानंतर दोन निवृत्त खेळाडूंचा यादीत समावेश आहे. शिखर धवन यादीत तिसरा असून त्याच्या ९,७९७ धावा आहेत तर सुरेश रैना ८,६५४ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
सूर्यकुमारने यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स या वानखेडेवरील सामन्यानंतर सूर्याच्या नावे सध्या ८,००७ धावा आहेत.