IPLच्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या नवा खेळाडूचा एकच राडा! धावांचा पाऊस पाडला, इशाराच दिला

IPL 2022 Auction च्या आधीपासूनच द.आफ्रिकेच्या युवा खेळाडूची जोरदार चर्चा सुरू झाली होती. याच खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सनं ३ कोटी रुपये मोजले. त्यानं आता मैदानात नुसता धावांचा पाऊस पाडला आहे.

आयपीएल २०२२ साठीचा लिलाव पूर्ण झाला असून सर्व संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. संघांनी असेही काही खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत की ज्यांची लिलावाआधीपासूनच जोरदार चर्चा होती. अंडर-१९ वर्ल्डकपमधील द.आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यातीलच एक खेळाडू आहे.

ब्रेविस या युवा खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स संघानं तब्बल ३ कोटी रुपये मोजून संघात दाखल केलं आहे. लिलावाच्या दुसऱ्याच दिवशी ब्रेविसनं तडफदार खेळी साकारत मुंबई इंडियन्सचे फॅन्सना आणि येणाऱ्या स्पर्धेची एक झलकच सादर केली आहे.

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ब्रेविस यानं द.आफ्रिकेच्या ट्वेन्टी-२० चॅलेंजमध्ये स्थानिक संघ टायटन्सकडून खेळताना आज एक जबरदस्त खेळी साकारली आहे.

प्रतिस्पर्धी डॉलफिन्स संघाकडून मिळालेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रेविस यानं फक्त ३० चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या आणि संघाला सात विकेट्सनं विजय प्राप्त करुन दिला आहे.

१८ वर्षीय डेवाल्ड ब्रेविस याला यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सनं ३ कोटी रुपये मोजून संघात स्थान दिलं आहे. यासह ब्रेविस सर्वाधिक किमतीची बोली लागलेला पहिला अंडर-१९ खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या अंडर-१९ खेळाडूला मिळालेली ही सर्वाधिक बोली आहे.

ब्रेविसनं यंदाच्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ५०६ धावा करत रेकॉर्ड केला आहे. तसंच तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील ठरला आहे.

ब्रेविस व्यतिरिक्त या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलरसारखे अनुभवी खेळाडू देखील सामील होते. या दोघांनाही आयपीएलमध्ये यंदा नव्या संघांनी खरेदी केलं आहे.

गुजरात टायटन्सचा नवा खेळाडू डेव्हिड मिलर यानं ट्वेन्टी-२० चॅलेंजमध्ये डॉलफिन्सकडून ४० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. तर क्विंटन डी कॉक यानं २६ धावा केल्या. डिकॉक याला आयपीएल लिलावात लखनऊ सुपर जाएंट्स संघानं खरेदी केलं आहे.