आयपीएलच्या २०२३ च्या हंगामासाठी शुक्रवारी कोचीमध्ये लिलावप्रक्रिया संपन्न झाली. या लिलावामध्ये सर्व १० संघांनी मिळून एकूण ८० खेळाडू खरेदी केले. या लिलावात सॅम करेनसह काही खेळांडूंना बंपर रक्कम मिळाली. मात्र काही खेळाडूंच्या पदरी मात्र निराशा आली. गेल्यावेळच्या कोट्यवधींच्या बोलीऐवजी त्यांना फार कमी किमतीत फ्रँचायझींनी खरेदी केले. अशाच सहा खेळाडूंचा घेतलेला हा आढावा.
काइल जेमिन्सन (१ कोटी) - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिन्सन याला चेन्नई सुपरकिंग्सने १ कोटी रुपयांना खरेदी केले. याच जेमिन्सनला २०२१ मध्ये आरसीबीने तब्बल १५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. म्हणजेच यंदाच्या हंगामात जेमिन्सनला १४ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
केन विल्यमसन (२ कोटी) - केन विल्यमसनला गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. आता यंदाच्या लिलावामध्ये विल्यमसनला २ कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने खरेदी केले आहे.
जाय रिचर्डसन (१.५ कोटी) - आयपीएल २०२१ च्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाला पंजाब किंग्सने १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र यावेळी त्याला मुंबई इंडियन्सने केवळ १.५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
मयांक अग्रवाल (८.२५) आयपीएल २०२२ मध्ये मयांक अग्रवालला पंजाब किंग्सने १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. मात्र सुमार कामगिरीमुळे यावेळी त्याला रिलिज करण्यात आले. आता यंदाच्या लिलावामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने त्याला ८.२५ कोटी रुपयांना खरेदी केले.
रोमारियो शेफर्ड (५० लाख) - गेल्या हंगामात तब्बल ७.५० कोटी रुपयांची बोली लागलेल्या रोमारियो शेफर्डला यावेळी केवळ ५० लाख रुपयांत लखनौ सुपरजायंट्स संघाने खरेदी केले. ५० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी करण्यात आले.
ओडियन स्मिथ ( ५० लाख) - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथ याला गुजरात टायटन्सने ५० लाख रुपयांना खरेदी केले. हीच त्यांची बेस प्राईस होती. ओडियन स्मिथला २०२२च्या ऑक्शनमध्ये पंजाबच्या टीमने त्याला ६ कोटी रुपयांना खरेदी केले होते.