IPL 2024 PBKS vs DC: पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.

पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजयी सुरुवात केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसरा सामना शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्या संघात पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सला नमवून शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला. (PBKS vs DC) प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आले.

मात्र, १७५ धावांचा बचाव करताना रिषभ पंतच्या (Rishab Pant) नेतृत्वातील संघाला अपयश आले. इशांत शर्माने एकाच षटकात शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांना बाद करून रंगत आणली होती.

पण, सहाव्या षटकादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली अन् दिल्लीला मोठा झटका बसला. (IPL 2024 Live) सॅम करनने ४७ चेंडूत ६३ धावा करून सामना पंजाबच्या बाजूने फिरवला.

हा सामना पाहण्यासाठी पंजाबच्या फ्रँचायझीची ओनर आणि अभिनेत्री प्रीती झिंटा देखील उपस्थित होती. तिने पंजाबच्या विजयानंतर एकच जल्लोष केला. यादरम्यान तिने चाहत्यांना हातवारे करत त्यांचा उत्साह वाढवला.

पंजाब किंग्जला विजयासाठी १७५ धावांची आवश्यकता होती. सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी अप्रतिम खेळी केली. दिल्लीकडून शेवटचे षटक सुमित कुमार टाकत होता. त्याने पहिले दोन चेंडू वाइड टाकल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव गेला. मग दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून लियाम लिव्हिंगस्टोनने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

पंजाबने १९.२ षटकात ६ बाद १७७ धावा करून विजयाचे खाते उघडले. पंजाबकडून सॅम करनने सर्वाधिक (६३) धावा केल्या, तर लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद (३८) धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर इशांत शर्माला (१) बळी घेण्यात यश आले.

सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने भारी प्रतिक्रिया दिली. पराभवाचे कारण सांगताना तो म्हणाला की, पराभव कशामुळे झाला याचे कारण सर्वांना माहिती आहे. मी कोणतेही कारण देणार नाही... पण इशांत शर्माची दुखापत आमच्या संघाला मोठा झटका देऊन गेली.

तसेच इशांत दुखापतीमुळे बाहेर गेल्याने आम्हाला अखेरच्या काही षटकांमध्ये त्याची कमी जाणवली. त्यामुळे कुठेतरी आमच्यावरील दबाव वाढला. पण नक्कीच आम्ही यातून काही तरी शिकलो असून या सामन्याचा निकाल खूप काही शिकवणारा आहे.

खरं तर इशांत शर्माने शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांना एकाच षटकात बाद केले. धवनचा त्रिफळा उडाला तर बेअरस्टो धावबाद झाला. पण डावाच्या सहाव्या षटकात क्षेत्ररक्षणादरम्यात इशांतला दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर गेला.