Join us  

T20 World Cup: ...म्हणून टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची दाणादाण; २००९, २०१०, २०१२ मध्ये दडलंय कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 3:29 PM

Open in App
1 / 10

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव झाल्यानं भारताचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता चमत्कारच भारताला वाचवू शकेल. या पराभवांमागचं महत्त्वाचं कारण अखेर समोर आलं आहे.

2 / 10

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताला मानहानीकारक पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. संभाव्य विजेता समजल्या जाणाऱ्या संघाला दोन सामन्यांत मोठ्या पराभवांचा सामना कराला लागला. फलंदाजी, गोलंदाजीत संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला.

3 / 10

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं अक्षरश: पानीपत झालं आहे. यामागाचं मोठं आणि महत्त्वाचं कारण अखेर समोर आलं आहे. आयपीएल खेळून भारतीय संघाचे खेळाडू जेव्हा जेव्हा टी-२० विश्वचषक स्पर्धेत उतरले, त्यावेळी संघाची कामगिरी सुमार झाल्याचं आकडेवारी सांगते.

4 / 10

२००७ मध्ये भारतीय संघानं टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यावेळी आयपीएल नव्हती. २०१४ मध्ये भारतानं उपांत्य फेरी गाठली, तर २०१६ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. या दोन्ही वर्षी आयपीएल विश्वचषक स्पर्धेनंतर झाली.

5 / 10

२००९ ते २०१३ या कालावधीत टीम इंडियाचे ट्रेनर राहिलेल्या रामजी श्रीनिवासन यांनी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं. आयपीएलमध्ये खेळाडू थकतात. याशिवाय आयपीएलमध्ये खेळाडूंना चुकांमधून सावरण्याची संधी मिळते. स्पर्धेचा कालावधी, त्यातील सामन्यांची संख्या अधिक असल्यानं चुकांची भरपाई करता येते. पण टी-२० विश्वचषकात तशी संधी मिळत नाही, असं श्रीनिवासन यांनी सांगितलं.

6 / 10

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला १४ सामने खेळायला मिळतात. बरेच चढ उतार पाहायला मिळतात. पण टी-२० विश्वचषकात एक किंवा दोन दिवस वाईट गेल्यास तुमचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. २००९ ते २०१२ या कालावधीत संघासोबत हेच घडलं याकडे श्रीनिवासन यांनी लक्ष वेधलं.

7 / 10

२००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत १८ एप्रिल ते २४ मे दरम्यान आयपीएल खेळवण्यात आली. त्यानंतर ५ जूनला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळाली नाही. विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडला गेला. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ सुपर-८ मध्ये तीन सामन्यांत पराभूत झाला. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंडनं भारताला पाणी पाजलं. त्यावेळी पाकिस्ताननं जेतेपद पटकावलं. पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी आहे.

8 / 10

२०१० मध्ये २५ एप्रिलला आयपीएलचा अंतिम सामना होता. त्यावेळी आयपीएल स्पर्धा खेळून भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजला पोहोचले. ३० एप्रिलपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. सुपर-८ मध्ये संघाची कामगिरी खराब झाली. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिजनं भारताला धूळ चारली.

9 / 10

२०१२ मध्ये थोडी वेगळी परिस्थिती होती. आयपीएल स्पर्धा खेळून २ महिने झाल्यावर भारतीय संघ श्रीलंकेला विश्वचषक स्पर्धेसाठी गेला. सुपर-८ मध्ये संघ दोन सामने जिंकला. पण नेट रनरेटमध्ये कमी पडल्यानं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. भारताच्या गटातील पाकिस्तान, ऑस्ट्रेलियानं पुढे कूच केली.

10 / 10

दुबईत आयपीएल खेळण्याआधी भारतीय संघातील खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होते. त्यानंतर सप्टेंबरपासून ते यूएईमध्ये आहेत. खेळाडू आधीपासूनच यूएईत असल्याचा फायदा होईल असा अंदाज होता. मात्र आयपीएलचा अनुभव कामी आला नाही. उलट पाकिस्तान, इंग्लंडच्या खेळाडूंची कामगिरी सरस झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये परवानगी नाही. तर इंग्लंडच्या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली होती.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतपाकिस्तानआयपीएल २०२१
Open in App