Join us  

शांत इशांतचे १०० नंबरी यश, अनेक चढउतार आणि अविस्मरणीय खेळी; अशी राहिलीय त्याची क्रिकेट कारकीर्द

By बाळकृष्ण परब | Published: February 24, 2021 12:45 PM

Open in App
1 / 11

अहमदाबादमध्ये आजपासून सुरू होत असलेला इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना हा भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा १०० वा कसोटी सामना ठरणार आहे. अशी कामगिरी करणारा इशांत हा कपिल देवनंतरचा भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्यानिमित्त आज आपण नजर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर.

2 / 11

इशांत शर्माला २००६-०७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेवेळी भारतीय संघात बोलावण्यात आले होते. मात्र त्याचे कसोटी पदार्पण झाले ते २५ मे २००७ पासून बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटीमधून. त्यानंतर पुढचे सहा महिने त्याची भारतीय संघात ये जा सुरू होती.

3 / 11

दरम्यान, इशांतच्या धारदार गोलंदाजीला खरी ओळख मिळाली ती २००७-०८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेमधून. या मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार रिकी पाँटिंगला चांगलेच त्रस्त केले. पर्थ कसोटीत त्याने पाँटिंगचा महत्त्वपूर्ण बळीही मिळवला होता. त्यानंतरच्या सीबी तिरंगी मालिकेतही त्याच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली होती.

4 / 11

२००८ मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात झालेल्या कसोटी मालिकेत इशांतने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्या मालिकेत १६ बळी घेत इशांत मालिकावीर ठरला होता. या मालिकेतही इशांतने रिकी पाँटिंगला तीनवेळा बाद केले होते.

5 / 11

गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही इशांतने एकदा भारतासाठी अविस्मरणीय कामगिरी कोली होती. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मोहाली कसोटीत चौथ्या डावात भारताची अवस्था ८ बाद १२४ अशी झाली होती. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या इशांतने व्हीव्हीएस लक्ष्मणला जबरदस्त साथ दिली होती. ३१ धावांची खेळी करणारा इशांत आणि लक्ष्मणनने नवव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. अखेर हा सामना भारताने एक विकेट राखून जिंकला होता.

6 / 11

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीचा आधार बनलेला इशांत एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात फार रुळू शकला नाही. त्याने ८० एकदिवसीय सामन्याक ११५, तर १४ टी-२० मध्ये आठ बळी मिळवण्यात यश मिळवले. मात्र नंतरच्या काळात त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी मिळणे बंद झाले.

7 / 11

यादरम्यान इशांतने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर आपल्या गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. या कसोटीत एका डावात ७४ धावांत ७ बळी घेत इशांतने भारतीय संघाला लॉर्डसवर ऐतिहासिक विजय मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

8 / 11

त्यानंतर २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत इशांतने तीन कसोटी १३ बळी टिपले. त्यादरम्यान त्याने कसोटी कारकीर्दीतील २०० बळी पूर्ण केले. दुखापती

9 / 11

दुखापती आणि फॉर्ममधील चढऊतार यामुळे इशांतची आयपीएलमधील कारकीर्द फारशी बहरू शकलेली नाही. तो आतापर्यंत कोलकाता नाईटरायडर्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून तो खेळला आहे.

10 / 11

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी इशांतने कसोटी क्रिकेटमधील आपल्या ३०० बळींचा आकडा गाठला.

11 / 11

तर आजपासून सुरू होणारी कसोटी ही इशांतची कसोटी क्रिकेटमधील १०० वी कसोटी ठरणार आहे.

टॅग्स :इशांत शर्माभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड