KL Rahul अन् श्रेयस अय्यर यांच्यात आता खरी स्पर्धा; सुनील गावस्कर यांच्या विधानात आहे तथ्य

भारतीय संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा कालच केली. लोकेश राहुल दुखापतीतून पूर्णपणे बरा होत श्रीलंकेत कालच दाखल झाला आहे.

भारतीय संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा कालच केली. युझवेंद्र चहलच्या जागी अक्षर पटेल याची झालेली निवड आश्चर्याची वाटली. KL Rahul आणि श्रेयस अय्यर हे पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून त्यांचा संघात समावेश केला गेला आहे. संजू सॅमसन याहीवेळेस वर्ल्ड कपची बस चुकला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी बहुतेक आशिया चषक स्पर्धेत खेळत आहेत. लोकेश राहुल दुखापतीतून पूर्णपणे बरा होत श्रीलंकेत कालच दाखल झाला आहे.

लोकेश राहुलच्या पुनरागमनामुळे आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला डावललं जातंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुलच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचं इशान किशनने सोनं केलं आहे आणि राहुल येताच त्याला बाहेर बसवले जाईल, अशी चर्चा आहे. पण, इशानने सलग चार वन डे सामन्यांत अर्धशतकं झळकावून सातत्य टीकवले आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवल्यास त्याच्यावर अन्याय होईल.

भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी एक सल्ला दिलाय आणि आता मधल्या फळीतील जागेसाठी लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांच्यात टक्कर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलेय. दुखापतीतून नुकताच सावरणाऱ्या राहुलकडून यष्टिरक्षण करून घेणे अयोग्य ठरेल, असेही त्यांना वाटते.

ते म्हणाले,''आशिया चषकाच्या सुपर ४ मध्ये आता लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांच्यात प्लेइंग इलेव्हनच्या जागेसाठी स्पर्धा रंगताना दिसेल. इशान किशनने पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी केलीय आणि राहुल व इशान या दोघांना एकत्रित खेळवणे योग्य असेल. इशानला यष्टिरक्षण करायला द्यायला हवं, कारण राहुल नुकताच दुखापतून बरा होऊन परतला आहे. त्यामुळे त्याला लगेच यष्टिंमागे उठ-बस करता येणार नाही. त्यामुळे चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी राहुल व अय्यर यांच्यात स्पर्धा आहे.''

''राहुल याने फलंदाजीत त्याची कामगिरी दाखवून दिली आहे आणि असा खेळाडू संघात असताना तुम्हाला थोडी मोकळीक मिळते. या प्रसंगात नेमके तेच घडले आहे. तो एकही क्रिकेट खेळला नाही ही चिंतेची बाब असू शकते. आता, तुम्ही त्याला श्रीलंकेला घेऊन जात आहात, तो काही सामने खेळू शकेल आणि मग तुम्हाला त्याचा फिटनेस दिसेल,”असेही गावस्कर म्हणाले.