ICC पुरस्कार नॉमिनेशनमध्येही बुमराहची कमाल; स्मृती मानधनासह श्रेयंकाही शर्यतीत

बुमराहला दोन गटातून नामांकन, त्याच्याशिवाय अर्शदीपसह महिला गटातून दोन चेहरे पुरस्काराच्या शर्यतीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं २०२४ या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची वेगवेगळ्या पुरस्कारासाठी नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. यात जसप्रीत बुमराह हा एकमेव क्रिकेट असा आहे ज्याला दोन गटातून नामांकन देण्यात आले आहे.

२०२४ या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी देण्यात येणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसह वर्षातील कसोटीतील सर्वोत्तम क्रिकेटर्सच्या यादीत बुमराहच्या नावाचा समावेश आहे.

पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये अर्शदीप सिंग वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या शर्यतीत आहे.

महिला क्रिकेटमध्ये भारताची स्टार बॅटर आणि उप कॅप्टन स्मृती मानधना हिला वनडेतील सर्वोत्तम क्रिकेटरच्या पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

श्रेयंका पाटील ही नवोदित खेळाडूंच्या यादीतून पुरस्काराच्या शर्यतीत आहे.

ICC पुरुष गटातील सर्वोत्तम क्रिकेटर्सच्या यादीत जसप्रीत बुमराहसोबत इंग्लंडचा हॅरी ब्रूक, श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस आणि इंग्लंडचा जो रुट यांचे आव्हान असेल.

सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी बुमराहसोबत जो रुट, हॅरी ब्रूकशिवाय ट्रॅविस हेडचाही समावेश असल्याचे दिसून येते.

बुमराहनं ज्या पद्धतीने वर्षभरात आपली छाप सोडलीये ते पाहता सर गारफिल्ड सोबर्स यांच्या नावे दिली जाणारी ही प्रतिष्ठित ट्रॉफी त्याच्या नावे होईल, असे वाटते. जर तसे झाले तर हा पुरस्कार मिळवणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटर ठरेल.

याआधी राहुल द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०), विराट कोहली (२०२७, २०१८) आणि आर अश्विन याने २०१६ च्या वर्षात हा पुरस्कार पटकवला होता.