जसप्रीत बुमराह थेट मुंबई इंडियन्सकडून IPL 2023 मध्ये खेळणार; BCCI बारीक लक्ष ठेवणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी व तीन वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) च्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांनी निराशा झाली.

बीसीसीआयने जलदगती गोलंदाजाला वन डे मालिकेसाठीही निवडले नाही. बुमराहला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने ( NCA) अद्याप तंदुरुस्त असल्याचे सर्टिफिकेट दिलेले नाही आणि बीसीसीआयही त्याच्याबाबत पुन्हा घाई करू इच्छित नाही.

भारतीय संघाला यंदाच्या वर्षात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळायची आहे. ( भारताचे स्थान आणखी एका कसोटी विजयानंतर निश्चित होईल.) त्यानंतर वन डे वर्ल्ड कपही आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहबाबत मागच्यावेळेसाऱखी घाई बीसीसीआयला करायची नाही. त्यामुळेच त्याचा ऑसींविरुद्धच्या कसोटी व वन डे मालिकेत समावेश केला गेलेला नाही.

याचा अर्थ जसप्रीत बुमराह थेट इंडियन प्रीमिअर लीगमधून ( IPL 2023) मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल आणि तेव्हात तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल. मुंबई इंडियन्स या गोलंदाजाला प्रतीवर्ष १२ कोटी एवढं मानधन देते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी तो संपूर्ण पर्व खेळण्याची शक्यता अधिक आहे.

पाच महिन्यांपासून जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि त्याला याच दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागले होते. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काही सराव सामने खेळण्याची शक्यता होती, परंतु NCA ने त्याला तिही परवानगी दिलेली नाही.

पण, हाती आलेल्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराह आयपीएलमधून पुनरागमन करणार आहे, परंतु बीसीसीआय त्याच्या वर्कलोडवर लक्ष ठेवणार आहे. परदेशी क्रिकेट बोर्ड खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी NOC देते आणि त्यात वर्कलोडचा स्पष्ट उल्लेख असतो. तसाच नियम आता बीसीसीआय आणू इच्छित आहे आणि फ्रँचायझींना त्याचे पालन करावे लागेल.