भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीची नजर एका मोठ्या रेकॉर्डवर असेल. या रेकॉर्डपासून विराट कोहली हा केवळ सहा धावांनी दूर आहे.
भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आधीच विजयी आघाडी घेतली. आहे. आता या सामन्यात विजय मिळवून मालिकेत निर्विवाद यश मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
दरम्यान, आज होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने सहा धावा काढल्यास तो टी-२० क्रिकेटमध्ये (टी-२० आंतरराष्ट्रीय+ लिस्ट ए) १२ हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज बनेल. तर जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज असेल. विराट कोहलीने आतापर्यंत ३७५ सामन्यांमध्ये ११ हजार ९९४ धावा फटकावल्या आहेत.
या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ४६३ सामन्यांमध्ये १४ हजार ५६२ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तानच्या शोएब मलिकने १२ हजार ९९३ धावा बनवल्या आहेत. तर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्ड हा १२ हजार ४३० धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटचा विचार केल्यास विराट कोहलीने भारतीय संघाकडून आतापर्यंत ११६ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ५२.४२ च्या सरासरीने ४ हजार ३७ धावा कुटल्या आहेत. या दरम्यान, विराट कोहलीने १ शतक आणि ३७ धावा कुटल्याा आहेत.
आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेमधून विराट कोहलीने १४ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. या मालिकेपूर्वी त्याने शेवटचा टी-२० सामना २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये १६ चेंडूत २९ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली होती.