१२ वर्षांनंतर क्रिकेटचा महामेळावा अर्थात वन डे विश्वचषक भारतात होत आहे. ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरूवात झाली असून पुढचे दीड महिने चाहत्यांना या व्यासपीठाचा आनंद लुटता येणार आहे.
जगभरातील दहा संघ एक ट्रॉफी आपल्या घरी नेण्यासाठी मैदानात आहे. यजमान भारतीय संघाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात असले तरी क्रिकेटमध्ये कशाचाच अंदाज लावला जाऊ शकत नाही हेही तितकंच खरं.
न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. भारताने देखील ऑस्ट्रेलियाला नमवून विजयी सलामी दिली. चालू विश्वचषकात सहभागी असलेल्या तीन विदेशी संघांमध्ये देखील भारतीय खेळाडू खेळत आहेत.
मूळ भारतीय असलेले सहा शिलेदार विदेशी संघातून आपल्या संघासाठी लढत आहेत. नेदरलॅंड्सच्या संघामध्ये सर्वाधिक तीन खेळाडूंचा समावेश आहे, जे भारतीय वंशाचे आहेत.
मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील असलेला केशव महाराज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग असून विश्वचषकात आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अनेकदा त्याने आपली प्रतिभा जगाला दाखवून दिली आहे.
न्यूझीलंडकडून सातत्याने चांगली कामगिरी करणारा रचिन रवींद्र मूळचा बंगळुरू येथील आहे. चालू विश्वचषकात देखील त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे.
न्यूझीलंडचा आणखी एक खेळाडू मूळचा भारतीय आहे. ईश सोधी पंजाबमधील लुधियाना येथील आहे. त्याला देखील विश्वचषकात किवी संघात स्थान मिळाले आहे.
दरम्यान, विक्रमजीत सिंग, तेजा निदामनुरु आणि आर्यन दत्त हे तीन भारतीय वंशाचे खेळाडू नेदरलॅंड्सच्या संघाचा भाग आहेत.
विक्रमजीत सिंग हा मूळचा पंजाबमधील जालंदर येथील आहे, तर तेजा निदामनुरु आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात घातक वाटणाऱ्या सौद शकीलचा त्रिफळा काढणारा आर्यन दत्त देखील मूळचा भारतीय असून नेदरलॅंड्सकडून विश्वचषक खेळत आहे. तो पंजाबमधील होशियारपूर येथील आहे.