सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. साखळी फेरीतील सामने अखेरच्या टप्प्यात आल्यामुळे उपांत्य फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. अ गटातून न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस होणार आहे. ब गटातून भारतीय संघाने 6 गुणांसह उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील उपांत्य फेरी गाठण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल विश्वचषकाच्या सुरूवातीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. मात्र बुधवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात राहुलने 50 धावांची शानदार खेळी केली होती. मात्र या सामन्यात देखील त्याने सुरुवातीला अनेक निर्धाव चेंडू खेळले. खरं तर पॉवरप्लेमध्ये त्याने कासवाच्या गतीने धावा केल्या होत्या. या स्पर्धेत आतापर्यंत राहुलने 4 सामन्यात 109.09 च्या स्ट्राईक रेटने केवळ 72 धावा केल्या आहेत. जर मागील सामना वगळला तर पहिल्या तीन सामन्यांमध्ये लोकेश राहुलने फक्त 22 धावा केल्या आहेत. ज्या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 64.70 आहे.
न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार केन विलियमसनची अवस्थाही लोकेश राहुलसारखीच झाली आहे. विलियमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, पण पॉवरप्लेमध्ये त्याच्या फलंदाजीचा विचार केला तर त्याच्या खात्यात धावांचा दुष्काळ आहे. एक यशस्वी कर्णधार आणि शानदार फलंदाज म्हणून विलियमसनची जगभर ख्याती आहे. मात्र पॉवरप्लेमध्ये त्याची फलंदाजीची आकडेवारी पाहिली तर तो केवळ डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो असे पाहायला मिळत आहे. केन विलियमसनचा टी-20 विश्वचषक 2022 मधील आतापर्यंतचा स्ट्राईक रेट 93.42 एवढा आहे.
पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार बाबर आझमने देखील विश्वचषकात पाकिस्तानी चाहत्यांना निराश केले. बाबर आणि रिझवान ही जोडी पाकिस्तानच्या संघाची ताकद म्हणून ओळखली जाते. मात्र पाकिस्तानच्या या दिग्गजांनी चाहत्यांना निराश केले आहे. बाबरच्या या खेळीवरून त्याच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने असेही म्हटले होते की, आम्ही बाबर आझमला पाकिस्तान सुपर लीगमध्ये जाणूनबुजून बाद करत नाही कारण त्याच्या संथ स्ट्राईकमुळे आम्हाला फायदा होतो. बाबर आझमचा टी-20 विश्वचषक 2022 मधील स्ट्राईक रेट 53.33 आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार टेम्बा बवुमाने मागील काही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. टेम्बा बवुमा पॉवरप्लेच्या षटकांमध्ये संथ गतीने धावा करतो आणि पॉवर वाचवून खेळण्याच्या प्रयत्नात असतो. टेम्बा बवुमा दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीराची धुरा सांभाळतो. परंतु पॉवरप्ले दरम्यान तो त्याचा सहकारी क्विंटन डी कॉकसारखे मोठे फटके मारण्यात यशस्वी होत नाही. टेम्बा बवुमाचा सुरूवातीच्या षटकातील स्ट्राईक रेट 60.86 एवढा आहे.