IPL 2020त भीमपराक्रम करण्यासाठी ख्रिस गेल सज्ज; रोहित, विराट यांनाही हा विक्रम मोडणे अशक्य!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

ट्वेंटी-20 क्रिकेटला खऱ्या अर्थानं पॉप्युलर करणाऱ्या IPLने अल्पावधीतच जगभरात आपले चाहते निर्माण केले. चौकार-षटकारांची आतषबाजी, सुपर ओव्हरचा थरार अन् अप्रतिम झेल या सर्वांनी इतकी वर्ष क्रिकेट चाहत्यांना वेड लावलं.

ट्वेंटी-20चा विषय सुरू असताना ख्रिस गेल ( Chris Gayle)चे नाव निघणार नाही, असे होणे अश्यक्यच. ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा, सर्वाधिक सामने, सर्वाधिक शतकं असे अनेक विक्रम गेलच्या नावावर आहेत. त्यामुळेच त्याला 'युनिव्हर्स बॉस' असे संबोधले जाते.

IPL 2020तही गेल एक भीमपराक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याला यश मिळाले, तर हा विक्रम करणारा तो जगातील पहिला आणि कदाचित भविष्यातही एकमेव फलंदाज राहील.

मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banagalore) कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यांनाही हा विक्रम मोडणे किंवा त्याच्या आसपासही पोहोचणे शक्य होणार नाही.

गेलनं 404 ट्वेंटी-20 सामन्यांत 13,296 धावा केल्या आहेत. त्यात 22 शतकं व 82 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याच्या नावावर 80 विकेट्सही आहेत.

आज आपण त्याचा आणखी एक असा विक्रम जाणून घेणार आहोत की IPL2020त त्याला यश मिळवले, तर तो खऱ्या अर्थानं युनिव्हर्स बॉस ठरेल.

गेलनं आतापर्यंत IPLच्या 11 पर्वांत सहभाग घेतला आहे आणि त्यापैकी 6 पर्वांत त्यानं 22पेक्षा अधिक षटकार खेचले आहेत. ट्वेंटी-20 सर्वाधिक 1026 चौकारांचा विक्रमही गेलच्या नावावर आहे.

IPLच्या चार पर्वांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यानं 2011 ( 44 षटकार), 2012 ( 59 षटकार), 2013 ( 51 षटकार) आणि 2015 ( 38 षटकार) या पर्वांत ही कामगिरी केली आहे. या चारही पर्वात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळला होता.

2013मध्ये त्यानं RCBकडून खेळताना पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध नाबाद 175 धावा चोपल्या होत्या आणि त्यात 17 चौकारांची आतषबाजी केली होती. ट्वेंटी-20त एका सामन्यात सर्वाधिक 18 षटकाराचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. पण, त्यानं हा विक्रम बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये केला होता.

IPLमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये एबी डिव्हिलियर्स ( 212 षटकार) आणि महेंद्रसिंग धोनी ( 209) यांचा क्रमांक येतो. ट्वेंटी-20त गेलनंतर सर्वाधिक षटकारांचा विक्रम किरॉन पोलार्डच्या ( 672) नावावर आहे. रोहित शर्मा ( 361) आणि विराट कोहली ( 286) हे कोसो दूर आहेत.

IPL 2020त किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 षटकारांचा पल्ला गाठण्याची संधी आहे.

IPL मध्ये सर्वाधिक 326 षटकारांचा विक्रम गेलच्या नावावर आहे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 978 षटकार आहेत. IPL 2020त त्यानं 22 षटकार खेचल्यावर तो 1000 धावांचा पल्ला गाठणार आहे.