kyle mayers : साधूसारखे केस अन् हत्तीसारखी ताकद! वेस्ट इंडिजच्या ज्युनिअर 'गेल'ची IPL मध्ये एन्ट्री

kyle mayers and chris gayle : वेस्ट इंडिजचा स्फोटक खेळाडू ख्रिस गेलने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

वेस्ट इंडिजचा स्फोटक खेळाडू ख्रिस गेलने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर गेलने आयपीएलमध्ये देखील अनेक विक्रम केले आहेत. आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा (१७५) करण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस गेलच्या नावावर आहे.

गेलच्या पाठोपाठ आणखी एक वेस्ट इंडिजचा स्फोटक खेळाडू समोर आला आहे. ख्रिस गेलसारखी हेअरस्टाईल, त्याच्यासारखी स्फोटक खेळी करण्याची क्षमता असलेला काइल मेयर्स सध्या चर्चेत आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामात खेळणाऱ्या ६७१ खेळाडूंपैकी केवळ २ जणांनी स्पर्धेच्या सुरूवातीच्या दोन डावात अर्धशतक झळकावले आहे. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या काइल मेयर्सच्या नावाची नोंद आहे.

काही चाहते मेयर्समध्ये ख्रिस गेलची झलक असल्याचे बोलतात. लखनौच्या फ्रँचायझीने मेगा लिलावात या खेळाडूला ५० लाख रूपयांमध्ये खरेदी केले होते, ज्याचा फायदा आताच्या घडीला संघाला होत आहे.

एक संपूर्ण हंगाम बाकावर बसल्यानंतर त्याला आपल्या पदार्पणाचा सामना खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध ३८ चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी केली. तर त्याच्या पुढच्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध काइलने २२ चेंडूत ५३ धावा कुटल्या.

खरं तर राजस्थान रॉयल्सने काइल मेयर्सला राखीव खेळाडू म्हणून २०२१ मध्ये आपल्या संघात घेतले होते. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना काइल मेयर्सने १०५ मीटर षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते.

त्याची ताकद आणि क्षमता पाहून लखनौच्या संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने काइलला आपल्या संघात घेतले. तरीदेखील काइल बाकावरच बसला असता मात्र दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विटन डी कॉक सुरूवातीच्या सामन्याला गैरहजर असल्यामुळे त्याला संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत काइल मेयर्सने स्वत:ला सिद्ध केले.

दरम्यान, मेयर्सने महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर २०० हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ५३ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. त्यामुळे आता त्याची संघातील जागा निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे लखनौच्या संघात बदल झाला तर मार्कस स्टॉयनिस बाकावर बसण्याची शक्यता आहे. कारण संघाचा नियमित सलामीवीर क्विंटन डि कॉक आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला आहे. अलीकडेच त्याने वेस्ट इंडिजविरूद्ध ट्वेंटी-२० सामन्यात ४४ चेंडूत शतक झळकावले.

लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने आतापर्यंत २ सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर लोकेश राहुलच्या संघाला एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.