दक्षिण आफ्रिकेची माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मिगनॉन ड्यू प्रिझने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ड्यू प्रिझने एप्रिलमध्ये कसोटी आणि वन डे क्रिकेटला अलविदा केला होता आणि आता तिने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केला आहे.
ड्यू प्रिझने जानेवारी २००७ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले. तिने २०१८ पर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले. पण आता वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी तिने हा खेळ सोडला आहे.
ड्यू प्रिझ ही दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे आणि ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. ड्यू प्रिझने वन डे क्रिकेटमध्ये ३७६० आणि ट्वेंटी-२०त १८०५ धावा केल्या आहेत. तिने एकच कसोटी खेळली आणि त्यात ११९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
२१ फेब्रुवारी २०१६ रोजी, ड्यू प्रिझ ही ट्वेंटी-२०त १००० धावा करणारी दक्षिण आफ्रिकेची पहिली महिला क्रिकेटपटू बनली, तर २०१७ मध्ये ती १०० वन डे सामने खेळणारी दक्षिण आफ्रिकेची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
ड्यू प्रिझने वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली,पण वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी तिने दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले. १३ वर्षांखालील सामन्यात तिने २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने २५८ धावा ठोकल्या होत्या. तिने आपल्या खेळीत १६ षटकार आणि २५ चौकार लगावले होते.