निवृत्ती घेताच भ्रष्ट खेळाडूंवर मोहम्मद हफीजचा निशाणा; शोएब मलिकबद्दलही केलं मोठं वक्तव्य

Pakistan Mohammad Hafeez : पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीजनं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्तीची घोषणा केली.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीजनं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्तीची घोषणा केली. यानंतर त्यानं भ्रष्ट खेळाडूंवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय त्यानं शोएब मलिकबाबतही मोठं विधान केलं.

भ्रष्टाचाराचे दोषी ठरलेल्या खेळाडूंना देशाचं प्रतिनिधित्व करण्याची कधीही संधी दिली जाऊ नये, असं हफीज म्हणाला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लाहोरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यानं यावर वक्तव्य केलं.

"मी आणि अझर अली यांनी या मुद्द्यावर तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन ठेवला, परंतु बोर्ड अध्यक्षांनी आम्हाला सांगितले की जर आम्हाला खेळायचे नसेल तर कोणतीही अडचण नाही, परंतु संबंधित खेळाडू खेळेल असं सांगितलं, ती माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी निराशा आणि वेदना," असंही त्यानं नमूद केलं.

मी आणि शोएब मलिक यांनी २०१९ च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली पाहिजे या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांच्या भूमिकेशी काहीही संबंध नाही, असंही हफीजनं स्पष्ट केलं.

मी २०१९ च्या विश्वचषकानंतर निवृत्तीबाबात विचार करत होतो. परंतु माझी पत्नी आणि काही शुभचिंतकांनी मला खेळण्यास सांगितलं. तेव्हा मी याविषयी विचार करत होतो. रमीझ राजा यांनी काय म्हटलं किंवा त्यांना काय वाटलं हा त्यांचा वैयक्तीत दृष्टीकोन आहे, असंही हाफीजनं स्पष्ट केलं.

मी टीका करणाऱ्यांना कायम सन्मान केलाय. मैदानावर उतरून त्यांना उत्तर देणं ही माझी कायम पद्धत राहीली आहे. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कोणत्याही व्यक्तीपासून नाराज नाही, असंही त्यानं नमूद केलं.

कोणतीही खंत न बाळगता मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. तसंच टी २० विश्वचषकानंतर आपण पीसीबी प्रमुखांना भेटायचे प्रयत्न केल्याचे मान्य केलं. यावेळी रमीझ राजांना रमीझ आपल्याला पीएसएल आणि कराराबद्दल बोलायचं असल्याचं वाटलं असं तो म्हणाला. पण अखेरीस ३१ डिसेंबरला जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांना माझ्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल त्यांना कळवायचं असल्याचं सांगितल्याचंही त्यानं स्पष्ट केलं.

हाफीज पाकिस्तानसाठी ५५ कसोटी सामने खेळला आहे. तसंच १० शतकांच्या मदतीनं त्यानं ३६५२ धावाही केल्या. याशिवाय त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५३ विकेट्सही घेतल्या आहेत.

त्यानं २१८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतकांच्या मदतीनं ६६१४ धावा केल्या. याशिवाय त्यानं १३९ विकेट्सही घेतल्या. हफीजनं ११९ टी २० सामन्यांमध्ये एकून २५१४ धावा केल्या आणि ६१ विकेट्सही घेतल्या आहेत.