MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचे IPLमधील हे शेवटचे वर्ष?; कॅप्टन कूलनं सोडलं मौन अन् सांगितला पुढचा प्लान

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीची संथ फलंदाजी पाहून आता त्यानं थांबायला हवं, असे सल्ले सुरू झाले. त्यामुळे आयपीएल २०२१ हे त्याचे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ( CSK) कर्णधार म्हणून शेवटचे सत्र असेल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला जात आहे. पण, यावर धोनीनं मंगळवारी मौन सोडले.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला १३५ धावाच करता आल्या. धोनी व अंबाती रायुडू हे अनुभवी फलंदाज मैदानावर असूनही CSKला मोठी मजल मारता आली नाही. त्या सामन्यात धोनीनं २७ चेंडूंत १८ धावा केल्या. धोनीची ही आयपीएलमधील २५+ चेंडूंचा सामना करूनही सर्वात संथ खेळी ठरली. यापूर्वी २००८मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध त्यानं ३१ चेंडूंत २३ धावा केल्या होत्या.

त्यात धोनीकडे आता टीम इंडियाच्या मेंटॉरची जबाबदारी आली आहे आणि अशात जर तो आयपीएल फ्रँचायझीसोबत कायम राहिल्यास कॉन्फीक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे तो CSKसोबत राहिल की नाही, यावरही चर्चा सुरू आहे. पण, धोनीनं यावरील चित्र स्पष्ट केलं.

धोनीला या पर्वात १३ सामन्यांत ८४ धावाच करता आल्या आहेत. त्यानं ११ झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्यानं चेन्नईकडून कर्णधार म्हणून नुकताच २००वा सामना खेळला अन् अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण २१७ सामन्यांत ४७१६ धावा केल्या आहेत. त्यानं १२४ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत.

इंडिया सिमेंटच्या ७५व्या वर्षानिमित्तानं धोनीनं त्याच्या चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. त्यात त्यानं निरोपाचा सामना चेन्नईत CSKच्या फॅन्ससमोर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानं अप्रत्यक्षपणे पुढील आयपीएलमध्येही खेळणार असल्याचे संकेत दिले. तो म्हणाला, CSKसोबतचा निरोपाचा सामना तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार आहे, आशा करतो की आम्ही चेन्नईत खेळू आणि सर्व फॅन्ससमोर मला निरोपाचा सामना खेळता येईल.''

Read in English