IPL Auction 2022: Mumbai Indiansने माझ्या मुलाला विकत घेतल्याने आमच्या घरात वाद निर्माण झालेत - 'बेबी एबी' Dewald Brewisच्या वडिलांची प्रतिक्रिया

Baby AB डेवाल्ड ब्रेव्हिसला मुंबईने ३ कोटींची बोली लावून संघात घेतलं.

बेबी एबी नावाने प्रसिद्ध झालेला दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटपटू डेवाल्ड ब्रेव्हिस याने U19 World Cup मध्ये दमदार कामगिरी करून दाखवली.

डेवाल्डच्या या कामगिरीमुळेच IPL 2022 Mega Auction मध्ये त्याच्यावर बोली लावण्यात आली. बेबी एबी ला संघात घेण्यासाठी CSK आणि पंजाब या संघांनी जोर लावला.

पण अखेर बेबी एबी डेवाल्ड ब्रेव्हिस IPL मध्ये ५ विजेतेपदं मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ३ कोटींच्या बोलीसह सामील झाला.

मुंबईने डेवाल्डला विकत घेतल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद झाला. दमदार युवा खेळाडूचं मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दणक्यात स्वागत केलं.

डेवाल्डनेही मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाल्याचा आनंद व्यक्त केला. पण त्याच्या वडिलांनी मात्र एक वेगळीच प्रतिक्रिया दिली.

मुंबई इंडियन्सने माझ्या मुलाला खरेदी करून त्यांच्या संघात दाखल करून घेतल्याने आमच्या घरात वाद निर्माण झाले आहेत, असं त्याचे वडिल एका मुलाखतीत म्हणाले.

मुंबई इंडियन्स हा IPL च्या इतिहासातील यशस्वी संघ असूनही डेवाल्डच्या वडिलांनी अशी प्रतिक्रिया का दिली, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. पण नंतर त्याचे उत्तर मिळाले.

डेवाल्डचे वडिल म्हणाले, "मी स्वत: KKR संघाचा खूप मोठा चाहता आहे. माझा मोठा मुलगा (डेवाल्डचा मोठा भाऊ) CSK संघाचा खंदा समर्थक आहे. माझी पत्नी ही खूप वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाची चाहती आहे. आणि आता डेवाल्डही मुंबईच्या संघात सामील झाला आहे. त्यामुळे माझ्या घरात एक मोठी अडचणच निर्माण झाली आहे."

दरम्यान, U19 वर्ल्ड कप गाजवलेला डेवाल्ड IPL मध्ये कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.