Mumbai Indians Playoff chance : मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारू शकते; जाणून घ्या महत्त्वाचं गणित

Mumbai Indians Playoff chance : कोलकाता नाइट रायडर्सनं गुरुवारी राजस्थान रॉयल्सवर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवताना आयपीएल २०२१च्या प्ले ऑफच्या दिशेनं मोठी झेप घेतली.

Mumbai Indians Playoff chance : कोलकाता नाइट रायडर्सनं गुरुवारी राजस्थान रॉयल्सवर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवताना आयपीएल २०२१च्या प्ले ऑफच्या दिशेनं मोठी झेप घेतली. कोलकाताच्या या विजयानं राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स हे दोन संघ स्पर्धेतून बाद झाले. मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशांनाही तडाखा बसला आहे, परंतु अजुनही त्यांच्याकडे एक संधी आहे.

कोलकाता विरुद्ध राजस्थान ( KKR vs RR) हा सामना एकतर्फी झाला. मुंबई इंडियन्सला ( MI) या सामन्याचा निकाल असा लागणे अपेक्षित नव्हते. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे तीन संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. क्वालिफायर १ मध्ये दिल्ली विरुद्ध चेन्नई असाच सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

शुबमन गिल ( ५६), वेंकटेश अय्यर ( ३८) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर KKRनं शारजात ४ बाद १७१ धावा उभ्या केल्या. या पर्वातील शारजातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात राजस्थानचा ( RR) डाव पत्याच्या बंगल्यासारखा गडगडला. राहुल टेवाटिया ( ४४) व शिबम दुबे ( १८) वगळता RR चे सर्व फलंदाज एकेरी धावेतच माघारी परतले. शिवम मावीनं २१ धावांत ४, तर ल्युकी फर्ग्युसननं १८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

या विजयानंतर कोलकाताच्या खात्यात १४ गुण झाले असून त्यांचा नेट रन रेट हा ०.५८७ इतका झाला आहे. उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असे सामने होणार आहेत. मुंबईच्या खात्यात १२ गुण आहेत आणि त्यांनी हैदराबादला नमवले तर त्यांचेही १४ गुण होतील.

पण, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा -०.०४८ इतका आहे आणि त्यांना हैदराबादवर फक्त विजय पुरेसा नाही. मुंबईला उद्याच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध २००+ धावा कराव्या लागतील आणि १७०+ धावांनी विजय मिळवावा लागेल. तरच ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतात. अन्यथा कोलकाताचा प्रवेश निश्चित आहेच.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला टॉप टूमध्ये एन्ट्री घ्यायची असल्यास त्यांना दिल्लीवर १६३+ धावांनी विजय मिळवावा लागेल. आयपीएलच्या इतिहासात १४६ धावांनी विजयाचा रेकॉर्ड आहे.

मुंबई विरुद्ध हैदराबाद या सामन्यात टॉस रोहित शर्मा अँड टीमचं नशीब ठरवणार आहे. जर हैदराबादनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्या, मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफसाठीचे आव्हान तिथेच संपुष्टात येईल.