Sarfaraz Khan : कसोटीत मिळाली नाही संधी, सर्फराज खानने शतकाने दिले उत्तर ; ४ बाद ६६ वरून मुंबईला सावरले

बीसीसीआयने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfraz Khan) पुन्हा डावलले

बीसीसीआयने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणाची संधी दिली, परंतु रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfraz Khan) पुन्हा डावलले. त्यानंतर खेळाडूने मोजक्या शब्दात आपले दुःख व्यक्त केले.

पण, तो थांबला नाही. आज दिल्ली संघाविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात मुंबईचा संघ ४ बाद ६६ धावा असा अडचणीत असताना पठ्ठ्याने आणखी एक शतक झळकावले अन् निवड समितीला सडेतोड उत्तर दिले.

रणजी करंडक स्पर्धेतील मागील २५ डावांतील हे त्याचे दहावे शतक ठरले. ट्वेंटी-२० संघात संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ याने मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. तो ३५ चेंडूंत ९ चौकारांसह ४० धावांवर माघारी परतला. तत्पूर्वी, मुशीर खान ( १४), अरमान जाफर ( २) व अजिंक्य रहाणे ( २) यांनीही विकेट टाकल्या होत्या.

४ बाद ६६ अशी अवस्था असताना सर्फराज पुन्हा एकदा संकटमोचक ठरला. त्याने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर किमान ५० डावांत सर्वाधिक सरासरी असलेला सर्फराज हा दुसरा फलंदाज आहे. ब्रॅडमन यांची सरासरी १०५.४ इतकी आहे, तर सर्फराजने ५३ सामन्यांत ८२.६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विजय मर्चंट आहेत.

सर्फराज व पी पवार यांनी चांगली खेळी केली. पण, पवारला २५ धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर शाम्स मुलानीने ( ३९*) सर्फराजला चांगली साथ दिली आहे.

सर्फराजने १४५ चेंडूंत १६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ११४ धावा केल्या आहेत आणि मुंबईच्या ५ बाद २५३ धावा झाल्या आहेत. सर्फराजने एकूण ५३ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ अर्धशतकं व १३ शतकांसह ३४८० धावा केल्या आहेत.