विराट, रोहित नव्हे तर 'या' खेळाडूत दिसते सचिनची झलक; माजी क्रिकेटरने मांडलं मत

भारतीय संघात सध्या नव्या आणि जुन्या खेळाडूंचा समतोल साधण्यात येत आहे.

Sachin Tendulkar Team India टीम इंडियाचा क्रिकेट कार्यक्रम सध्या अतिशय व्यस्त आहे. पुढील वर्षभरात टीम इंडियाला अनेक सामने खेळायचे असून परदेशातही विविध दौरे खेळायचे आहेत. टीम इंडियाच्या सुदैवाने संघाकडे अनेक प्रतिभावान खेळाडू असल्याने व्यस्त वेळापत्रक असूनही काही खेळाडूंना विश्रांती देण्याची संधी निवड समितीला मिळते. पण मोठ्या स्पर्धांसाठी संघ निवडताना काही खेळाडूंना संघाबाहेर राहावे लागते.

गेल्या वर्षी टी२० वर्ल्ड कप सारखी मोठी स्पर्धा झाली. या स्पर्धेत ठराविक खेळाडूंचा संघ निवडायचा होता. अशा वेळी नव्या-जुन्याचा मिलाफ करताना अनेक सिनियर खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले नाही. निवड समितीचाही यास नाईलाज असल्याचे अनेक क्रिकेट जाणकारांनी सांगितले. काहींनी असाही अंदाज बांधला की नव्या प्रकारच्या क्रिकेटला साजेसे सिनियर मंडळी नसल्याने काहींना संघातून बाहेर ठेवण्यात आले.

पण असे असले तरी, नव्या पिढीसोबत स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर नक्की कशा पद्धतीचा खेळ करायला हवा, याबद्दल माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने मत व्यक्त केले. नव्या पिढीशी जुळवून घेत संघातील स्थान काय ठेवण्याचा समतोल सचिनने उत्तम रितीने साधल्याचे जाडेजा म्हणाला. तसेच, सध्याच्या टीम इंडियामध्ये एका खेळाडूमध्ये सचिनची तीच झलक, उर्मी, ऊर्जा आणि नवे शिकण्यास आस दिसते असेही तो म्हणाला.

"तुमच्या कारकिर्दीत कधी ना कधी असा एक टप्पा येतो जेव्हा तुम्हाला काही गोष्टी नव्याने शोधाव्या लागतात आणि नव्या पिढीप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवावा लागतो. कारण निसर्ग नियमानुसार नवी पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा नेहमीच 'स्मार्ट' असते. नवी पिढी नव्या गोष्टी झटपट शिकते आणि आत्मसात करते. नवी पिढी तुम्हाला नेहमी नवीन शिकायला उद्युक्त करते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर", असे अजय जाडेजा म्हणाला.

पुढे बोलताना त्याने सविस्तर सांगितले, "जेव्हा युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी आणि इतर नवीन खेळाडू टीम इंडियात आले त्यावेळी सचिनच्या डोक्यात काही तरी नक्कीच चालू असणार. त्यानेदेखील मग हेच केले. नव्या पिढीतील खेळाडूंशी आणि त्यांच्या प्रतिभावान खेळीशी जुळवून घेण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यास सचिनने स्वत:ला उद्युक्त केले. त्याने खेळाची गती लक्षात घेत नव्या पिढीनुसार आपली फलंदाजी बदलली आणि पुन्हा सर्वोत्तम बनला."

"सध्याच्या टीम इंडियामध्येही मोठ्या प्रमाणावर नव्या पिढीचे खेळाडू येत आहेत. पण त्यामुळे सिनियर खेळाडूंनी गोंधळून जाऊ नये. उलट स्पर्धा तीव्र झाली की तुम्ही स्वत:ला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पुढे ढकलत असता आणि त्याचा तुम्हालाच फायदा होतो. सचिनने असं बरेचदा केलं. आधी द्रविड, गांगुली हे लोकं आले तेव्हा आणि नंतर युवराज, सेहवाग, धोनीची पिढी आली तेव्हा सचिनने स्वत:च्या खेळीत बदल केला. आता शिखर धवनमध्येही मला सचिनची झलक दिसते. त्यानेही आता असंच केलं पाहिजे", असं स्पष्ट शब्दांत अजय जाडेजा म्हणाला.