IND vs BAN : रोहित शर्मा नसल्याने आता राहुल द्रविडचं काम सोपं झालं! माजी खेळाडूच्या दाव्यात अजब तर्क

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला दुखापतीमुळे आधीच धक्के बसले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला दुखापतीमुळे आधीच धक्के बसले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या वनडे सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांनी आधीच दुखापतीमुळे या दौऱ्यातूनच माघार घेतली होती.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल पहिल्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारताला उर्वरित ६ पैकी ५ सामने जिंकावे लागणार आहेत आणि पुढील चार सामन्यांची मालिका ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

रोहित शर्माचे नसणे भारतीय संघासाठी चिंता वाढवणारे असले तरी भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याचे मत काही वेगळे आहे. रोहितच्या नसण्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचं काम सोपं झाल्याचे मत कैफने व्यक्त केले आहे. कैफच्या मते रोहितच्या नसण्याने द्रविडला प्लेइंग इलेव्हन निवडण्यात आता काहीच अडचण असणार नाही.

"जर रोहित तिथे असता तर द्रविडला दुसरा सलामीवीर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागला असता.कारण शुभमन गिल आणि लोकेश राहुल हे शर्यतीत होते. आता रोहित शर्मा नसल्यामुळे गिल आणि राहुल ही जोडी पल्या कसोटीसाठी सलामीला येऊ शकते. तिसऱ्या क्रमांकावर पुजारा, विराट कोहली चौथ्या, श्रेयस अय्यर पाचव्या, रिषभ पंत सहाव्या आणि त्यानंतर अश्विन व पाच गोलंदाज येतील. रोहित नसल्यामुळे द्रविडसाठी निवड करणे थोडे सोपे होईल," असे कैफ म्हणाला.

भारताचा कसोटी संघ- लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, रिषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.