विराट कोहलीच्या कार्यकाळातील 'ती' चूक रोहित शर्माला सुधारणार; नवा कर्णधार संघात बदल आणणार!

भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित शर्मानं त्याचं काम सुरू केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत एकत्र आले आहेत आणि कसून सराव करत आहेत. यावेळी रोहितनं BCCI.TV ला मुलाखत दिली आणि त्यानं कर्णधार म्हणून पुढील वाटचालीबाबत गप्पा मारल्या.

भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित शर्मानं त्याचं काम सुरू केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत एकत्र आले आहेत आणि कसून सराव करत आहेत. यावेळी रोहितनं BCCI.TV ला मुलाखत दिली आणि त्यानं कर्णधार म्हणून पुढील वाटचालीबाबत गप्पा मारल्या.

रोहित शर्मानं समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संकटावर मात करून तुम्ही कसे पुढे येता, हे संघ म्हणून महत्त्वाचे असल्याचे म्हणताना रोहितनं सांगितलं की संघाला ३ बाद १० किंवा २ बाद १५ अशा अडचणीतूही बाहेर यावं लागेल.

ट्वेंटी-२० आणि वन डे संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला संघातील बऱ्याच विभागावर काम करायचे आहे. त्यानं मधल्या फळीवर जास्त भार देताना, त्यांना सलामीच्या खेळाडूंच्या अपयशानंतर संघासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. हे फक्त उदाहरण त्यानं दिलंय, यापेक्षा अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज असल्याचे तो म्हणाला. संघ म्हणून चांगली कामगिरी करण्याचे प्रयत्न थांबता कामा नये, असेही तो म्हणाला.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका ३-० अशी जिंकली. बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत रोहितनं अनेक मुद्यांवर त्याचे स्पष्ट मत मांडले. वन डे संघाचा कर्णधार म्हणून रोहितनं १० सामन्यांत ७७.५७च्या सरासरीनं ५४३ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. नाबाद २०८ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं १०पैकी ८ सामने जिंकले आहेत.

''मी संघातील प्रत्येक खेळाडूलाही हाच संदेश देऊ इच्छितो. महत्त्वाच्या स्पर्धेदरम्यान बोलणारी अनेक लोकं असतात, पण जे आपल्या हातात आहे त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं. तुम्ही जो खेळ करत आलाय, तोच खेळ कायम राखायला हवा. त्यामुळे मैदानाबाहेर काय चर्चा सुरूय यापेक्षा आपण एकमेकांबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. राहुल भाई हेच वातावरण संघात कायम राखण्याचा प्रयत्न करत आहेत,''असेही रोहित म्हणाला.

''विराट कोहलीनं या संघाला उंचीवर आणले आहे की जिथून मागे वळून पाहायला नको. मागील पाच वर्ष त्यानं फ्रंटवर राहुन भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्याचा एकच स्पष्ट ध्येय व दृढनिश्चय होता, तो म्हणजे प्रत्येक सामना जिंकायचा आणि संपूर्ण संघालाही त्यानं तोच संदेश दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळतानाचे क्षण सुंदर होते. त्याच्या कर्णधारपदाखाली मी बरंच क्रिकेट खेळलो आहे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. पुढेही मी हेच कायम ठेवणार आहे,''असेही रोहित म्हणाला.

तो म्हणाला,''मला जेवढी संधी मिळाली, ते मी माझं भाग्य समजतो. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला त्याचा आनंद आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी तयार आहे. हा प्रवास रंजक होणार आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी एक गोष्ट कायम ठेवली ती म्हणजे खेळाडूंशी स्पष्ट संवाद, प्रत्येकाला त्याची जबाबदारी नीट कळावी याची काळजी घेतली.''