तेल गेले तूपही गेले! पाकिस्तानची अशी ही 'शान', ३ वर्षांपासून आपल्याच घरात मार खाणारी मंडळी

PAK vs BAN 2nd Test : बांगलादेशने सलग दुसरा सामना जिंकून पाकिस्तानचा २-० ने दारुण पराभव केला.

बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानला मोठा झटका देत सलग दुसरा कसोटी सामना जिंकला. यासह आपल्या मायदेशात विजयापासून वंचित राहण्याची शेजाऱ्यांची मालिका कायम आहे. बांगलादेशला नमवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानी संघ मैदानात उतरला होता.

पाकिस्तानला मागील जवळपास तीन वर्षांपासून आपल्या घरात एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदला कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि तिथेही त्यांना जबर मार खावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे WTC च्या शर्यतीत कायम राहणे शेजाऱ्यांना कठीण झाले आहे.

वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची 'कसोटी' पाहायला मिळत आहे. खरे तर पाकिस्तानला तब्बल १,३०३ दिवसांपासून आपल्या घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

विशेष म्हणजे बांगलादेश नंतर इतर सर्वात जुन्या दहा कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी प्रत्येकाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावणारा पाकिस्तान हा दुसरा संघ ठरला आहे.

वन डे विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानला ट्वेंटी-२० विश्वचषकात अमेरिकेसारख्या नवख्या संघाने पराभवाची धूळ चारली.

भारतात झालेल्या वन डे विश्वचषक २०२३ नंतर पाकिस्तानच्या संघात अनेक बदल करण्यात आले. बाबर आझमला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले मग ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तोंडावर पुन्हा एकदा त्याला कर्णधार बनवण्यात आले.

शान मसूद पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम आहे. पण, त्याच्या नेतृत्वात शेजाऱ्यांना एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून शाहीन शाह आफ्रिदीला वगळण्यात आले होते.

सलामीच्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला. पाहुण्या बांगलादेशने पाकिस्तानला दणका देत दुसरा सामना देखील जिंकला.

यासह शेजाऱ्यांना आपल्या घरात सलग दहाव्या सामन्यात विजयापासून दूर राहावे लागले. खरे तर पाकिस्तानला मायदेशात झालेल्या मागील दहा सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करताना २-० ने मालिका खिशात घातली. दुसरा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला मोठा संघर्ष करावा लागला असली तरी त्यांच्या या कामगिरीने इतिहास रचला.