भारताविरूद्ध सामन्यापूर्वी पाकिस्तानची शक्कल, दुबईत तयारी, काय आहे '२० मिनिटांचा प्लॅन'?

PAK vs IND CT 2025: भारत पाकिस्तान यांच्यात रविवारी महासामना रंगणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीतील या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी दुबईत चॅम्पियन ट्रॉफीचा महासामना रंगणार आहे. या बहुचर्चित सामन्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट टीम पूर्णपणे तयारीला लागली आहे. कारण एका पराभवामुळे पाकिस्तान टीमचं गणित बिघडू शकते. या थ्रिलर सामन्यासाठी शेजारील देश दुबईत स्पेशल तयारी करत आहे.

चॅम्पियन ट्रॉफीत न्यूझीलँडसोबत पहिला सामना गमावल्यानंतर आता २३ फेब्रुवारीला भारताविरोधात पाकिस्तान टीम खेळणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल. दुसरीकडे भारतीय टीमने चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेश टीमला धूळ चारली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील किक्रेट सामना हायप्रोफाईल असतो. दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे असते. त्यात दोन्ही टीमच्या खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. त्यामुळे या सामन्याच्या आधी पाकिस्तान टीमने खास तयारी केली आहे.

पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो या स्थितीचा आहे. जर भारतीय टीमने पाकिस्तानी टीमचा पराभव केला तर त्यांना टूर्नामेंटच्या सेमी फायनलपर्यंत पोहचणे कठीण होईल. न्यूझीलँडविरोधात सुरुवातीच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमचा ६० धावांनी पराभव झाला होता.

न्यूझीलँडने केलेला पराभव आणि भारतीय टीमशी सामना यामुळे पाकिस्तानी टीमने शुक्रवारी एक एक्सटेंडेड प्रॅक्टिस सेशनचं आयोजन केले होते. म्हणजे पाकिस्तानी टीमने त्यांच्या खेळाडूंचा वर्क आऊट टाईम आणखी वाढवला.

पाकिस्तानी टीमने दुबई इंटरनॅशनल स्टेडिएमवर ३ तास अभ्यास केला. ज्यात कॅप्टन मोहम्मद रिजवान वगळता सर्व फलंदाजांनी २० मिनिटांच्या अधिकच्या प्रॅक्टिस सत्रात भाग घेतला. यावेळी बाबर आझमने भारताविरोधातील सामन्यापूर्वी टीममधील गोलंदाजांचा सराव करून घेतला.

बाबर आझमने सर्व गोलंदाजांचा किमान दोन षटके सामना केला. माजी कर्णधाराने न्यूझीलंडविरुद्ध ९० चेंडूत ६४ धावांची खेळी केली होती. पाकिस्तानचा कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अपेक्षा असलेले जलद गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांच्याकडून केली जात आहे.

या दोघांनी ७-७ षटकांची गोलंदाजी केली. पाकिस्तानचे अंतरिम कोच आकिब जावेद आणि कॅप्टन रिजवानने खेळाडूंसोबत दीर्घ वेळ बैठक घेतली त्यात बहुतांश चर्चा आकिब जावेदने खेळाडूंसोबत केली.

भारत पाकिस्तान दोन संघ मैदानात उतरतात त्यावेळी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांशिवाय जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. ट्रॉफी जिंकली नाही तरी चालेल, पण भारत-पाक मेगा लढतीत पराभव पदरी पडू नये, अशी आशा प्रत्येक भारतीय चाहत्यांची टीम इंडियाकडून असते.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या सामन्या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. भारत या आयसीसी स्पर्धेतही पाकिस्तानविरुद्धचा आपला उत्कृष्ट रेकॉर्ड कायम ठेवेल, अशी आशा गांगुलीने व्यक्त केली आहे.