India vs Pakistan, Mohammad Rizwan: भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय संबंध तणावपूर्ण आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये गेल्या १०-१२ वर्षांपासून क्रिकेट मालिका खेळल्या जात नाहीयेत. ICC ने आयोजित केलेल्या स्पर्धांव्यतिरिक्त चाहत्यांना भारत-पाक सामने पाहायला मिळत नाहीत.
पाकिस्तानी आजी माजी क्रिकेटपटू सातत्याने भारताविरूद्धचे क्रिकेट संबंध सुधारण्याबाबत बोलत असतात. पण पाकिस्तानने दहशवादी कारवाया थांबवल्याशिवाय उभय देशांमध्ये क्रिकेट मालिका होणार नाहीत हे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.
याचदरम्यान, पाकिस्तानचा नवा खेळाडू मोहम्मद रिझवान याने असा दावा केला आहे की, पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणेच भारतीय खेळाडूंनाही भारत-पाक क्रिकेट मालिका खेळण्यात रस आहे.
भारतीय संघ पाकिस्तानमध्ये शेवटचं क्रिकेट २००५-०६ साली खेळला. त्यानंतर घडलेल्या विविध घटनांमुळे भारत-पाक क्रिकेट मालिका कायमच्या बंद झाल्या.
कोविड काळात भारत-पाक क्रिकेट मालिका आयोजित करून त्याच्या निधीचा बाधितांसाठी वापर केला जावा, असा प्रस्ताव काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मांडला होता. पण भारतीय क्रिकेटर्सने त्याला स्पष्टपणे नकार दिला.
तशातच, मोहम्मद रिझवानने आता या संदर्भात मोठा दावा केला आहे. 'पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणेच टीम इंडियातील क्रिकेटर्सनादेखील भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवली जावी असं वाटतं. दोन्ही संघांच्या खेळाडूंना एकमेकांविरोधात क्रिकेट खेळावंसं वाटत. पण दोन देशांमधील राजकीय तणाव पाहता हे खेळाडूंच्या नियंत्रणात नाही', असा दावा त्याने केला.