PAK vs ENG 2nd T20I : बाबर आजम-मोहम्मद रिझवान इंग्लंडला पुरून उरले, २०३ धावांच्या वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक विक्रम मोडले

Pakistan vs England 2nd T20I : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवली जात आहे. पहिल्या ट्वेंटी-२०त इंग्लंडने दणदणीत विजय मिळवून ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आज बरोबरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरले अन् बाबर आजम ( Babar Azam) व मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) हे दोघंच इंग्लंडला पुरून उरले.

Pakistan vs England 2nd T20I : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवली जात आहे. पहिल्या ट्वेंटी-२०त इंग्लंडने दणदणीत विजय मिळवून ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आज बरोबरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरले अन् बाबर आजम ( Babar Azam) व मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) हे दोघंच इंग्लंडला पुरून उरले.

ॲलेक्स हेल्स व फिल सॉल्ट यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी पहिल्या ५ षटकांत ४२ धावा फलकावर चढवल्या. पण, शाहनवाज दहानीने दोन चेंडूंत पाकिस्तानला कमबॅक करून दिले. २१ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २६ धावा करणाऱ्या हेल्सला सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दहानीने त्रिफळाचीत केले. दहानीने टाकलेला संथ चेंडू हेल्सला हेरता आला नाही. त्यानंतर डेविड मलानला गोल्डन डकवर दहानीने बाद केले.

फिल सॉल्ट ( ३०) व बेन डकेटने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. दोघांनी पहिल्या १० षटकांत ८० धावांपर्यंत मजल मारली. डकेट २२ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. हॅरी ब्रुकने १९ चेंडूंत ३१ धावा केल्या, तर मोईन अलीने २३ चेंडूंत नाबाद ५५ धावा केल्या. त्याने ४ चौकार व ४ षटकार खेचले आणि इंग्लंडला ५ बाद १९९ धावांपर्यंत पोहोचवले.

प्रत्युत्तरात, बाबर व मोहम्मद यांनीच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. बाबरचा फॉर्म आशिया चषक २०२२ स्पर्धेत बिघडला, परंतु आज त्याने कहर केला. त्याने ६६ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ११० धावा करताना त्याचे २६वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. रिझवानने ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा केल्या.

इंग्लडचे २०० धावांचे लक्ष्य बाबर व रिझवान या जोडीने सहज पार केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०३ धावांची ही भागीदारी धावांचा पाठलाग करतानाची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०२१मध्ये बाबर व रिझवान यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९७ धावा जोडल्या होत्या.

बाबरने या खेळीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा ओलांडताना विराट कोहलीचा विक्रम मोडला. बाबरने २१८ इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठला, तर विराटला २४३ इनिंग्ज खेळाव्या लागल्या होत्या. या विक्रमात ख्रिस गेल २१३ इनिंग्जसह अव्वल स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दोन शतक झळकावणारा बाबर पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला. अहमद शेहजाद व मोहम्मद रिझवान यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. एकही विकेट न गमावता २००+ धावांचे लक्ष्य पार करणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला. २०१७मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने गुजरात लायन्सचे १८४ धावांचे लक्ष्य १० विकेट्स राखून पार केले होते.

बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ट्वेंटी-२०त पाचवेळा १५०+ धावांची भागीदारी केली आहे. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी दोन वेळा हा पराक्रम केला. कर्णधार म्हणून बाबरने ट्वेंटी-२०त दुसरे शतक झळकावून स्वित्झर्लंडच्या फहिम नाझीर ( ७ डाव), भारताच्या रोहित शर्मा ( ४० डाव), व ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग ( ८२ डाव) यांच्याशी बरोबरी केली.