Babar Azam, Asia Cup 2022 IND vs PAK: पाकिस्तानी कर्णधाराने भारतीयांना डिवचलं! म्हणाला, "मला तो दिवस आठवला..."

पाकिस्तानच्या विजयामुळे भारत स्पर्धेबाहेर गेला, त्यातच बाबर आझमने 'हे' विधान केलं.

Babar Azam, Asia Cup 2022 IND vs PAK: पाकिस्तानी संघाने अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवत Asia Cup 2022 च्या फायनलमध्ये धडक मारली. अफगाणिस्तानने दिलेल्या १३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने शेवटच्या षटकात विजय मिळवला. ६ चेंडूत ११ धावांची आवश्यकता असताना आणि ९ गडी बाद झालेले असतानाही नसीम शाहने २ चेंडूत २ षटकार मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानच्या संघाने धमाकेदार कामगिरी सुरू ठेवत स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. पण अफगाणिस्तानच्या संघाचा पराभव हा भारतीयांच्याही जिव्हारी लागला. कारण आजच्या पराभवामुळे अफगाणिस्तानने स्वत:सोबतच भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. आता ११ सप्टेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका असा रंगणार आहे.

आज पाकिस्तानचा विजय होताच भारताला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. हे दु:ख भारतीय चाहत्यांना पचवणे कठीण आहे याची साऱ्यांनाच कल्पना असेल. पण असे असतानाच, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने सामन्यानंतर बोलताना भारतीय क्रिकेटप्रेमींना डिवचण्याचा प्रयत्न केला. 'आज मला तो दिवस आठवला..' म्हणत बाबरने भारतीय क्रिकेटरसिकांची एका जखमेवर मीठ चोळलं.

सामना संपल्यानंतर बोलताना कर्णधार बाबर आझम म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचं तर सामना शेवटच्या टप्प्यात असताना ड्रेसिंग रूममध्ये खूपच टेन्शनचं वातावरण होतं. संघातील प्रत्येक खेळाडू सारखा ड्रेसिंग रूममधून ये-जा करत होता. एका जागी बसून शांतपणे सामना बघणे कोणालाही जमत नव्हतं. नसीम शाहने ज्या प्रकारे सामना जिंकवला ती गोष्ट खरंच अप्रतिम होती. आम्ही आज मिळवलेली विजयी लय कायम राखू आणि पुन्हा त्याच चुका न करण्याचा नक्कीच प्रयत्न करू."

"शारजाच्या मैदानावर कायमच कमी धावसंख्येचे सामने होतात. त्यातच अफगाणिस्तानकडे मुजीब उर रहमान आणि राशिद खान हे जगातील सर्वोत्तम दोन स्पिन गोलंदाज होते. त्यामुळे सामना शक्य तितका शेवटपर्यंत खेचत न्यायचा, हाच आमचा प्लॅन होता. आमच्या गोलंदाजीची सुरूवात खूपच छान झाली होती. फलंदाजीत मात्र अपेक्षेपेक्षा थोडंसं वेगळं घडलं. आम्ही ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे सुरूवातीला फलंदाजी झाली नाही. पण प्रत्येक दिवस सारखा नसतो त्यामुळे आम्ही आलेला दिवस जगण्याची मजा घेऊ," असं बाबर आझम सकारात्मक पद्धतीने म्हणाला.

"नसीम शाहने अफलातून फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. नसीमने या आधीही अशा प्रकारची खेळी केल्याचं मला आठवत होतं. त्यामुळे मला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, आणि त्याने तो विश्वास सार्थ ठरवला. आजच्या नसीमच्या विजयी षटकारामुळे मला तो दिवस आठवला जेव्हा जावेद मियाँदादच्या भारताविरूद्ध मारलेल्या षटकाराने आम्ही जिंकलो होतो," असं म्हणत बाबर आझमने भारतीय क्रिकेटपटूंच्या जुन्या जखमेवर पुन्हा मीठ चोळत त्यांना डिवचलं.