Harbhajan Singh on Babar Azam, IND vs PAK: भारतीय संघाचा अनुभवी माजी फिरकीपटू याने अनेक बड्या बड्या फलंदाजांसमोर गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाविरोधात हॅटट्रिकचा कारनामा त्याच्या नावे आहे.
हरभजनने गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आता तो समालोचक आणि क्रिकेट जाणकार म्हणून काम पाहतो. याच भूमिकेत असताना त्याने नुकतेच एक मोठे विधान केले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची तुलना अनेकदा विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि जो रूट या महान फलंदाजांशी केली जाते. याच मुद्द्यावर हरभजनने मत व्यक्त केले.
'बाबर आझम सध्याच्या घडीला सर्वोत्तम चार (Fab 4) फलंदाजांपैकी एक आहे का, हे सागणं जरा घाईचं ठरेल. त्याला थोडंसं क्रिकेट खेळू दे. त्याला त्याच्या संघासाठी सामने जिंकवू देत.', असं हरभजन म्हणाला.
'सध्याच्या क्रिकेटमध्ये नक्की Fab 4 कोण हे सांगणंही जरा कठीणच आहे. सध्या भरपूर क्रिकेट खेळलं जातं. त्यात अनेक नवे खेळाडू चमक दाखवतात. पण बाबर आझमच्या फलंदाजीचा दर्जा उच्च प्रतीचा आहे.', असं भज्जीने नमूद केलं.
'बाबर हा एक तंत्रशुद्ध खेळी करणारा फलंदाज आहे. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात तो महान फलंदाजांच्या यादीत नक्कीच स्थान मिळवेल. पण एक नक्की, सध्याच्या घडीला प्रतिभेच्या स्तरावर तो सर्वोत्तम खेळाडूंच्या पंगतीत नक्कीच आहे', असं मत हरभजनने व्यक्त केले.