पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी

अलीकडेच पाकिस्तानला आपल्या मायदेशात बांगलादेशकडून दारुण पराभव पत्करावा लागला.

जागतिक क्रिकेटमध्ये कधीकाळी बलाढ्य संघांना आव्हान देणारा पाकिस्तान आजच्या घडीला नवख्या संघाकडूनही जबर मार खात आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, अमेरिका आणि झिम्बाब्वे या संघांनी मागच्या काळात शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली.

सततच्या पराभवांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही धाडसी निर्णय घेत खेळाडूंना झटका दिला. मात्र, तरीदेखील पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे.

अलीकडेच पाकिस्तानला आपल्या मायदेशात बांगलादेशकडून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेटचे जुने दिवस परत आणण्याचे काम हाती घेतले असून यासाठी त्यांनी खेळाडूंसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.

पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आणि फलंदाज होते. वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, इम्रान खान, झहीर अब्बास, जावेद मियांदाद असे महान खेळाडू याच देशातून आले.

ही यादी बरीच मोठी आहे, परंतु आता पाकिस्तानच्या संघाला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पाकिस्तानच्या खराब कामगिरीचे एक कारण संघातील गटबाजी असल्याचे सांगितले जाते आणि त्यावर मात करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक शिबिर आयोजित केले होते, ज्यामध्ये प्रशिक्षकांव्यतिरिक्त अनेक खेळाडूंनी भाग घेतला होता.

या शिबिरात या सर्वांनी एकत्र बसून पाकिस्तान क्रिकेटला 'अच्छे दिन' आणण्यासाठी रोडमॅप तयार केला.

यादरम्यान मर्यादित षटकांच्या संघाचे प्रशिक्षक कर्स्टन यांनी खेळाडूंसमोर तीन अटी ठेवल्या.

कर्स्टन यांनी खेळाडूंकडून डेडिकेशन, स्वाभिमान आणि एकतेची मागणी केली आहे.

कर्स्टन म्हणाले की, पाकिस्तानचा संघ यशस्वी व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे पण त्यासाठी काही पावले उचलावी लागतील. मला वाटते की, आपल्या सर्वांना एक यशस्वी संघ हवा आहे. संघाने प्रत्येक गोष्टीत चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. पाकिस्तान हा एक अतिशय प्रतिभावान संघ आहे. पण यशस्वी होण्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.