IND vs PAK, T20 World Cup: एकीकडे भारताने उडवला पाकचा धुव्वा तर दुसरीकडे पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला- जय श्रीराम!

भारतात येऊन राम मंदिराला भेट देणार असल्याचीही व्यक्त केली इच्छा

IND vs PAK, T20 World Cup 2022 | Jay Shree Ram tweet: भारतीय संघाने आशिया चषकातील पराभवाचा रविवारी पाकिस्तान विरूद्ध बदला घेतला. एका वेळेला अशक्य वाटणारे आव्हान, विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पेलून दाखवले. डावाची सुरूवात खराब होऊनही शेवटपर्यंत धीर न सोडता विराटने एकहाती सामना जिंकवला.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला १६० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्याला हार्दिक पांड्याची उत्तम साथ लाभली. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाचा विजय साकारला.

भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर पाकिस्तानी आजी-माजी खेळाडूंनी पाक खेळाडूंच्या चुकांवर पांघरूण घालण्यास सुरूवात केली आणि पंचांचे निर्णय वादग्रस्त असल्याचे मत मांडले. पण एका पाकिस्तानी क्रिकेटरने मात्र, भारत-पाक सामन्यातील हेवे दावे विसरून, थेट 'जय श्रीराम' असं ट्वीट केले.

भारतीय संस्कृतीत दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. या सणाला दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. विराट आणि टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवत भारतीयांना दिवाळीचे गिफ्ट दिले आणि सण साजरा करण्याचा उत्साह द्विगुणित करून दिला.

दिवाळीच्या सणाबद्दल भारतातूनच नव्हे तर भारताबाहेरील अनेक लहान-मोठ्या सेलिब्रिटींकडून शुभेच्छा देण्यात आल्या. दिवाळीच्या मंगलसमयी काही सेलिब्रिटींनी आपल्या मनातील इच्छाही बोलून दाखवल्या आणि लवकरच त्या इच्छा पूर्ण होवोत असेही म्हटले. पाकिस्तानच्या क्रिकेटरनेदेखील तसेच एक ट्वीट केले.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने अनेकदा तो पाकिस्तानी हिंदू असल्याचे अभिमानाने सांगितले आहे. भारताने पाकिस्तानला रविवारी पराभूत केले असले, तरी त्याने भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 'जय श्रीराम! संपूर्ण जगभरातील साऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आता माझी पुढची इच्छा म्हणजे प्रभू श्रीरामाच्या मंदिरात येऊन भगवान रामाचे दर्शन घेणे. मी नक्की येईन," असे ट्वीट त्याने केले. एका पाकिस्तानी खेळाडूकडून 'जय श्रीराम'चे ट्वीट आल्याने या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.