पाकिस्तानी खेळाडूंना ४ महिन्यांपासून नाही पगार, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी उपसले आंदोलनाचे हत्यार

पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानावरील कामगिरी, मैदानाबाहेरील वाद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सोबतच्या तणावामुळे नेहमी चर्चेत राहतो. त्यामुळे त्यांनी आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसले.

पाकिस्तानी खेळाडू PCB सोबत न सुटलेल्या पेमेंट समस्यांमुळे त्यांच्या जर्सीवरील प्रायोजक लोगोवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहेत.

क्रिकेट पाकिस्तानमधील एका सूत्रानुसार, खेळाडूंना त्यांचे मासिक रिटेनर आणि मॅच फी मिळण्यास चार महिन्यांचा विलंब झाला आहे. यामुळे संघाने आतापर्यंत मूक निषेध केला आहे. वर्ल्ड कप जसजसा जवळ येत आहे, तसतसे विरोधाची तीव्रता वाढू शकते, खेळाडू त्यांच्या जर्सीवरील प्रायोजक लोगो टाळून निषेध नोंदवण्याचा विचार करत आहेत.

एका खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ते स्वेच्छेने देशासाठी विनामूल्य खेळतील, परंतु त्यांच्या पगाराला विलंब झाल्यामुळे PCBशी संलग्न प्रायोजक लोगो घालण्यास नकार दिला. वर्ल्ड कपदरम्यान ICC च्या इव्हेंट्समध्येही बहिष्काराची भाषा त्यांनी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की होऊ शकते.

"आम्ही पाकिस्तानचे विनामूल्य प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहोत, परंतु आमचा प्रश्न आहे की आम्ही प्रायोजकांच्या लोगोचा प्रचार का करावा जो बोर्डाशी संलग्न आहे. आम्ही प्रमोशनल इव्हेंट्स आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास नकार देऊ शकतो,” असे पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितले.

PCB ने अव्वल खेळाडूंना PKR ४.५ दशलक्ष भरीव मासिक रिटेनर फी देण्याचे वचन दिले होते. पण, ही रक्कम बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे, ज्यामुळे सध्याचे मतभेद आहेत. पीसीबीला आयसीसी आणि प्रायोजकांकडून मिळणाऱ्या महसुलातही खेळाडू वाटा उचलत आहेत.

या आव्हानांना न जुमानता पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास सज्ज आहे. ते २९ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळतील. त्यांचा अधिकृत स्पर्धेचा प्रवास ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध सुरू होईल.