Babar Azam : बाबर आझम हट्टी; विराटकडून शिकायला हवं, पाकच्या माजी खेळाडूनं केली कानउघडणी

टी 20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भलेही उपविजेता ठरला असेल, पण या स्पर्धेत त्याचा कर्णधार बाबर आझमची कामगिरी फारच खराब होती.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने अंतिम फेरी गाठली होती जिथे त्यांना इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानचा संघ भलेही उपविजेता ठरला असेल, पण या स्पर्धेत त्याचा कर्णधार बाबर आझमची कामगिरी फारच खराब होती. सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्धचं अर्धशतक सोडलं तर बाकीच्या मॅचमध्ये बाबर आझमला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

आता पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने बाबर आझमवर टीका केली आहे. बाबर आझमने आपला जिद्द सोडावी आणि सलामीची जागा सोडून पाकिस्तान क्रिकेटच्या हिताचा विचार करावा, असे कनेरियाने म्हटले आहे. कनेरियाने माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचे निस्वार्थी असल्याबद्दल कौतुक केले आणि बाबरला त्याच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला.

“बाबर आझम आपले ओपनिंग स्पॉट न सोडण्यावर ठाम आहेत. कराची किंग्जसोबत असतानाही हे घडले. तो यावर ठाम आहे कारण त्याला मधल्या फळीत फलंदाजी करता येत नाही. या आडमुठेपणामुळे डावाची सुरुवात संथपणे होते आणि त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटचे नुकसान होत आहे,” असे दानिश कनेरिया आपल्या युट्यूबवरील व्हिडीओमध्ये म्हणाला.

विराट कोहलीसारखा नि:स्वार्थी कोणीही नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक गमावला आणि त्यानंतर त्याला लक्ष्य करण्यात आले. त्याच्या संघातील स्थानावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण त्याने हार मानली नाही. त्याने नवीन कर्णधाराला आपला पूर्ण पाठिंबा दिला आणि ज्या क्रमांकावर त्याला खेळायला सांगितले होते तिथे तो खेळल्याचं त्याने म्हटलं.

विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कोहली टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. T20 विश्वचषक 2022 च्या सहा सामन्यांमध्ये कोहलीने 98.66 च्या सरासरीने आणि 136.40 च्या स्ट्राइक रेटने 296 धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. एमसीजीमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.