Team India ODI World Cup: आगामी २०२३च्या वर्ल्डकपसाठी 'या' खेळाडूंची जागा निश्चित; पाहा संभाव्य १५ खेळाडूंचा भारतीय संघ

Team India ODI World Cup: भारतीय संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे.

भारतीय संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. ही स्पर्धा फक्त भारतातच खेळवली जाणार असून गेल्या १२ वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची वाट पाहणाऱ्या भारतीय संघाची नजर या विश्वचषकाकडे आहे.

भारतीय संघ आगामी वन-डे विश्वचषकासाठी टीम बनवण्यासाठी विविध खेळाडूंना संधी देत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही हे स्पष्ट दिसून आले.

भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी आणि खेळाडूंनी ज्या प्रकारे खेळ दाखवला आहे. त्यावरून भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसह वन-डे विश्वचषकात पुढे जाऊ शकतो, याचे संकेत मिळत आहेत.

टी-ट्वेंटी विश्वचषक २०२२ मधील पराभवानंतर बीसीसीआयमध्ये खळबळ उडाली होती आणि तेव्हापासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची तयारी सुरू झाली होती. बीसीसीआयकडून आगामी विश्वचषकासाठी २० खेळाडूंची यादी शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे.

बीसीसीआयने गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यामध्ये भारतीय संघातील नवीन खेळाडूंची निवड, त्यांचा फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करण्यासंदर्भात चर्चा झाली. यासोबतच वन-डे विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बोर्डाने खेळाडूंचा कोअर ग्रुपही तयार केला आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुलसारखे वरिष्ठ खेळाडू, जे अनेकदा एकदिवसीय मालिकेत विश्रांती घेतात, ते आता नियमित एकदिवसीय सामन्यांमध्येही खेळू लागले आहेत आणि संघाचे संपूर्ण लक्ष एकदिवसीय फॉर्मेटकडे वळले आहे.

२०२३ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ६ एकदिवसीय सामने आणि इतर खेळाडूंकडे पाहिल्यास आगामी वन-डे विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंचा समावेश होईल, याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

शुभमन गिलने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे आणि ज्या आत्मविश्वासाने तो एकदिवसीय सामन्यात डाव खेळताना दिसत आहे, त्यावरून तो रोहित शर्मासोबत एकदिवसीय विश्वचषकात सलामी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विराट कोहलीचा क्रमांक-३ वर खेळणे निश्चित आहे. तर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित करू शकतात.

वनडेत चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनलाही संधी मिळू शकते. त्याचबरोबर केएल राहुलचा नंबर यष्टीरक्षक म्हणून येतो. मात्र, सूर्या-इशान आणि केएल राहुलपैकी एकालाच प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळू शकते.

जर आपण गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंबद्दल विचार केल्यास हार्दिक पांड्याची निवड निश्चित आहे. तसेच तो सध्या भारतीय वन-डे संघाचा उपकर्णधार देखील आहे. याशिवाय, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह (अजूनही दुखापतग्रस्त, विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त असू शकतो) या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीवर अवलंबून राहता येईल. भारतीय संघाकडे फिरकी विभागात कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेलसारखे पर्यायही आहेत.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत (फिट असल्यास), वॉशिंग्टन सुंदर