विराट आणि रोहितलाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवा, BCCI च्या कारवाईनंतर दिग्गज क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

BCCI Cricket:

क्रिकेटपटूंना रणजी क्रिकेट सामने खेळणे अनिवार्य करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य कीर्ती आझाद यांनी स्वागत केलं आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी सामने खेळण्यास नकार दिल्याने त्यांना बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातून वगळण्यात आलं आहे.

बीसीसीआयनं उचललेलं हे एक चांगलं पाऊल आहे. तसेच हा नियम विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंवरही लागू केला पाहिजे, असं कीर्ती आझाद यांनी म्हटलं आहे.

आझाद म्हणाले की, बीसीसीआयने केलेली ही सूचना एक चांगलं पाऊल आहे. प्रत्येक खेळाडूने रणजी करंडक स्पर्धेत खेळलं पाहिजे. पाच दिवसांचं क्रिकेट हेच खरं क्रिकेट आहे. जेव्हा कधी खेळाडू मोकळे असतील तेव्हा त्यांनी आपल्या राज्यासाठी रणजी सामने खेळले पाहिजेत. त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सुद्धा अपवाद नाही. राज्यांनी तुम्हाला खेळाडू बनण्याची संधी दिली आहे त्यामुळे तुम्ही देशासाठी खेळू शकलात याची जाणीव ठेवली पाहिजे.

मात्र केवळ ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना अशा प्रकारे शिक्षा देणं योग्य नाही, असंही मत आझाद यांनी मांडलं. केवळ दोघांना शिक्षा देणं योग्य नाही. प्रत्येकाकडे समान नजरेनं पाहिलं गेलं पाहिजे, असे ते म्हणाले.

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले आहेत का या प्रश्नाचं उत्तर देणं आझाद यांनी टाळलं. ते म्हणाले की, माझ्या प्रश्न आहे की, ते पुरेसं देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. ते टी-२० क्रिकेट खेळत आहे. तसेच प्रत्येक प्रदेशामध्ये टी-२० लीग आहे.

जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा सर्व खेळाडू आपल्या राज्याच्या संघांकडून खेळायचे. तसेच त्याचा त्यांना अभिमान होता. मात्र आता अशी परिस्थिती नाही, असे आझाद म्हणाले. तसेच टी-२० क्रिकेट आणि रणजी क्रिकेटमध्ये उत्तम समन्वय साधल्याबद्दल आझाद यांनी ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांचं त्यांनी कौतुक केलं.