Pollard, IND vs WI 2nd T20: "म्हणून सामना खेचून आणला तरीही आम्ही हरलो"; कर्णधार पोलार्डने सांगितलं पराभवाचं कारण, एक चूक झाल्याचीही दिली कबुली

शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला केवळ ८ धावा कमी पडल्या. त्यामुळे भारतीय संघाने सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली.

Pollard, Rohit Sharma, IND vs WI 2nd T20: भारतीय संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजला अटीतटीच्या लढतीत पराभूत केले. शेवटच्या ४ चेंडूत २३ धावांची गरज असताना Rovman Powell ने दोन षटकार खेचत भारतीय संघावर दबाव टाकला होता. पण शेवटच्या दोन चेंडूवर भारताने सामना जिंकला.

दुसऱ्या टी२० सामन्यात भारताकडून Virat Kohli ने ५२ तर Rishabh Pant ने नाबाद ५२ धावा करत १८६ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा रॉवमन पॉवेल (नाबाद ६८) याने निकोलस पूरनच्या (६२) साथीने दमदार फलंदाजी केली. पण अखेर त्याचे प्रयत्न तोकडे पडले.

सामना संपल्यानंतर कर्णधार किरॉन पोलार्ड याने पराभवाचं कारण सांगितलं. "रॉवमन पॉवेल खूपच छान खेळला. पूरनच्या साथीने त्याने आम्हाला जवळपास विजय मिळवूनच दिला होता. पण भारताच्या अनुभवी गोलंदाजांनी आमच्याकडून विजयश्री खेचून नेली."

"रॉवमन पॉवेल आणि निकोलस पूरन दोघांनाही उत्तम फलंदाजीचं श्रेय द्यायलाच पाहिजे. त्यांच्यामुळेच आम्ही सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचू शकलो. चेंडू स्विंग होत होता. भारताकडे चांगले गोलंदाज असल्यामुळे आम्हाला मोक्याच्या क्षणी हवे तसे फटके खेळणं जमलं नाही", असं पोलार्ड म्हणाला.

"पहिल्या सामन्यात आमची फलंदाजी मधल्या टप्प्यात खराब झाली होती. पण दुसऱ्या सामन्यात आम्ही ती चूक सुधारली. आमचा पराभव झाला असला तरी त्यासाठी आम्ही फलंदाजांना दोष देणार नाही", अशा शब्दात पोलार्डने फलंदाजांची स्तुती केली.

"या सामन्यात आम्हाला आठ धावा कमी पडल्या. पण पुढच्या वेळी आम्ही मोक्याच्या क्षणी कशी फटकेबाजी केली पाहिजे यावर अभ्यास करून अधिक तयारीने मैदानात उतरू", असा निर्धार पोलार्डने व्यक्त केला.

दरम्यान, दुसऱ्या सामन्यातील विजयामुळे भारताने तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत २-०ची विजयी आघाडी घेतली असून तिसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि ऋषभ पंत खेळणार नसल्याचे सांगितलं जात आहे.