आयपीएल २०२५ साठी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात अनेक भारतीय स्टारसह परदेशी खेळाडूंची गर्दी पाहायला मिळणार आहे. यात अनसोल्ड राहिल्यामुळं अनेक खेळाडू 'दर्दे दिल' झाल्याचा सीनही पाहायला मिळेल.
गत हंगामात ८ कोटींसह दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला पृथ्वी शॉ यंदाच्या लिलावात दिसणार आहे. त्याने ७५ लाख एवढ्या मूळ किंमतीसह आपली नाव नोंदणी केली आहे.
कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे पृथ्वी शॉची किंमत कमी असली तरी त्याच्यावर डाव खेळण्याची हिंमत कोणी दाखवणार नाही, अशी परिस्थिती आहे. या युवा क्रिकेटला अनसोल्डचा टॅग लागण्याची शक्यता आहे. हा खेळाडू रिकी पॉन्टिंगच्या मनात भरलेला आहे. जर त्याने चाल खेळली तर तो या कठिण परिस्थितून उभा राहू शकेल.
अमित मिश्रा पुन्हा एकदा लिलावात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. १६२ सामन्यात १७४ विकेट्स घेत आयपीएलमध्ये या गोलंदाजाने खास छाप सोडली आहे. पण वाढत्या वयामुळे फ्रँचायझी संघ त्याच्यावर पैसा खर्च करण्याची रिस्क घेतील, असे वाटत नाही.
पहिल्या हंगामापासून IPL स्पर्धेत दिसणारा मनीष पांडे यावेळी अनसोल्ड राहू शकतो. १७१ सामन्यांचा अनुभव असलेल्या या क्रिकेटरचे स्ट्राइक रेट आणि कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे त्याचा लिलावात निभाव लागणं मुश्किल दिसते.
शार्दूल ठाकूर याला मागील काही हंगामात प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या लिलावासाठी त्याने २ कोटी या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली आहे. मोठ्या बेस प्राइजमुळे तो अनसोल्ड राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उमेश यादवच्या बाबतीतही हाच मुद्दा आहे. ३७ वर्षीय गोलंदाजाने मेगा लिलावासाठी २ कोटीच्या क्लबमधून नाव नोंदणी केली आहे. ही रक्कम फ्रँचायझी संघाला मोठी वाटू शकते. ज्याचा या क्रिकेटरला फटका बसू शकतो.
क्रुणाल पांड्यानेही २ कोटी या मूळ किंमतीसह लिलावात सहभाग नोंदवला आहे. त्याच्यासाठी एवढी रक्कम खर्च करणं फ्रँचायझीसाठी घाट्याचा सौदा ठरेल. हा विचार करून फ्रँचायझी संघांनी हात आखडता घेतला तर त्याच्यावरही अनसोल्ड राहण्याची नामुष्की ओढावू शकते.