IPL 2020 vs PSL 2020 : आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये किती बक्षीस रक्कम दिली जाते माहित्येय?

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला.

मुंबईचे हे पाचवे जेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये जेतेपद पटकावले होते. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेताना DCला २० षटकांत ७ बाद १५६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकाच्या जोरावर MIनं सहज बाजी मारली.

IPL 2020पूर्वी बीसीसीआयनं बक्षीस रक्कम ५०% कमी करण्याचा निर्णय घेतला होता. २०१९मध्ये मुंबई इंडियन्सनं ( MI) जेतेपद पटकावलं होतं आणि त्यांना २० कोटी बक्षीस रक्कम मिळाली होती.

बीसीसीआयनं मागील वर्षी बक्षीस रक्कम म्हणून ३२.५ कोटी खर्च केले होते. त्यानुसार विजेत्या संघाला २० व उपविजेत्याला १२.५ कोटी दिले होते. तेवढीच रक्कम बीसीसीआयनं यंदा दिली. बीसीसीआयनं कॉस्ट कटिंगचा निर्णय मागे घेतला.

मुंबई इंडियन्स ( विजेता) - २० कोटी, दिल्ली कॅपिटल्स ( उपविजेता) - १२.५ कोटी, सनरायझर्स हैदराबाद ( प्ले ऑफ) - ८.७८ कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( प्ले ऑफ) - ८.७८ कोटी अशी बक्षीस रक्कम यंदाही देण्यात आली.

आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगचा ( Pakistan Super League) अंतिम सामना आज कराची किंग्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात रंगणार आहे.

पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना २२ मार्चला होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे लीगचे प्ले ऑफ सामने पुढे ढकलण्यात आले. यंदा पीएसएलला नवा विजेता मिळणार आहे.

पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या मोसमात एकूण १ मिलियन म्हणजेच ७.५ कोटी ( भारतीय चलन) रुपये बक्षीस म्हणून वाटले जाणार आहेत. त्यापैकी विजेत्या संघाला ३.७२ कोटी, तर उपविजेत्याला १.५ कोटी दिले जातील.

याशिवाय ३.३५ लाख रुपयांचे ३४ खेळाडूंमध्ये समान वाटप केले जाईल. सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आदी पुरस्कारांसाठी एकूण ६० लाख रुपये दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम सर्वोत्तम कॅच, बेस्ट रन आऊट व सर्वाधिक षटकार आदी पुरस्कारांसाठी असेल.