Rahul Dravid Birthday: “या रिपोर्टरला बाहेर काढा..,” जेव्हा पाकिस्तानात राहुल द्रविडला आलेला राग

११ जानेवारी म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे.

११ जानेवारी म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने वयाची ५० वर्षे पूर्ण केलीत.

क्रीडा जगतातील दिग्गजांसह चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 1973 मध्ये इंदूरमध्ये जन्मलेल्या द्रविडची स्वतःची एक वेगळी शैली आहे आणि तो त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो.

पण द्रविडलाही राग येतो हे तुम्हाला माहितीये का? ‘द ‘वॉल आणि 'मिस्टर ट्रस्टवर्दी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला एकदा पाकिस्तान दौऱ्यावर असताना प्रचंड राग आला होता. हा राग पत्रकार परिषदेदरम्यान आला, जेव्हा द्रविडने एका पत्रकाराला बाहेर काढण्याचेही वक्तव्य केले होते.

ही घटना 2004 मध्ये भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर घडली होती. त्यानंतर कसोटी मालिकेत द्रविडनं तुफान फलंदाजी केली होती. त्याने 3 सामन्यांच्या 4 डावात 309 धावा केल्या. याच पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने मॅच फिक्सिंगबाबत प्रश्न केला होता.

त्यावेळी राहुल द्रविडला प्रचंड राग आला. तेव्हा त्यानं या व्यक्तीला कोणीतरी बाहेर काढा असे म्हटले. हे सर्व चुकीचे आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी खेळासाठी चांगल्या नाही, असेही तो म्हणाला होता.

द्रविडला राग येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यानंतर 2006 मध्ये एकदा राहुल द्रविड चांगलाच चिडला होता. ही घटना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान घडली. त्या मालिकेत द्रविड संघाचा कर्णधार होता. यादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला होता.

या पराभवामुळे संतप्त झालेल्या द्रविडने ड्रेसिंग रूममध्ये खुर्ची फेकली. खरे तर त्या विजयासह इंग्लंड संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. अशा स्थितीत द्रविडला पराभव सहन झाला नाही आणि तो संतापला होता.

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दोघांनी 1996 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले. गांगुलीने पहिल्या कसोटी डावात शतक झळकावले, तर द्रविडचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. परंतु 2002 मध्ये, द्रविडने सलग चार कसोटी शतके झळकावली, ज्यात हेडिंग्ले येथे कठीण परिस्थितीत केलेल्या 148 धावाही होत्या.

टीम इंडियाचे फक्त दोनच फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त राहुल द्रविडने 13,288 कसोटी धावा केल्या आहेत, ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविडने वनडेमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या 12 शतकांचा समावेश आहे.