Cricket Buzz»फोटो गॅलरी »१२ वीच्या पुढे शिकू शकला नाही अन् शतकी खेळीचा घरच्यांनाही विश्वास बसेना! RCBच्या 'हिरो'ची कहाणी१२ वीच्या पुढे शिकू शकला नाही अन् शतकी खेळीचा घरच्यांनाही विश्वास बसेना! RCBच्या 'हिरो'ची कहाणी By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 7:53 PMOpen in App1 / 9आयपीएलमध्ये 'करो या मरो' अशी परिस्थिती असलेल्या सामन्यात आरसीबीचा युवा फलंदाज रजत पाटीदारनं लक्षवेधी कामगिरी करत नाबाद ११२ धावांची महत्वाची खेळी साकारली आणि संघासाठी विजयश्री खेचून आणली. या खेळीनंतर रजत पाटीदार आरसीबीसाठी 'हिरो' ठरला आहे.2 / 9रजत पाटीदारनं संघातील दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतलेले असताना मैदानात टिच्चून फलंदाजी करत अवघ्या ५४ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या साथीनं नाबाद ११२ धावा ठोकल्या. या खेळीच्या जोरावर आरसीबीनं लखनौसमोर विजयासाठी २०७ धावांचा डोंगर उभारला. आरसीबीनं लखनौला पराभूत करत विजेतेपदाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं आहे. 3 / 9रजत पाटीदारकडून आजवर त्याच्या क्षमतेला साजेशी खेळी करता येत नव्हती. तरीही संघ त्याच्या पाठिशी ठाम उभा राहिला आणि अतिशय महत्वाच्या सामन्यात पाटीदारनं त्याची निवड सार्थ करुन दाखवली. पण त्याचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. २८ वर्षांच्या या युवा क्रिकेटपटूमागे त्याचे प्रचंड कष्ट दडले आहेत. 4 / 9मूळचा इंदूरचा असलेल्या रजत पाटीदारच्या कुटुंबीयांनी त्याच्या आजच्या यशामागे लहानपणापासून त्यानं क्रिकेटप्रती दिलेलं आत्मसमर्पण आणि शिस्त याचा खूप मोठा वाटा आहे. रजतचे वडील मनोहर पाटील यांचं महारानी रोड परिसरात मोटारपंपचा व्यवसाय आहे. 5 / 9'आयपीएलच्या एलिमनेटर सामन्यात रजत अर्धशतक सहज ठोकेल असं आम्हाला माहितच होतं. पण त्यानं थेट शतकी खेळी साकारून नाबाद राहिला हे पाहून आम्हाला धक्काच बसला', असं रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये रजत पाटीदार एकमेव असा खेळाडू होता की ज्याचा लिलाव होऊ शकला नाही. पण पर्यायी खेळाडू म्हणून आरसीबीनं त्याला संघात दाखल करुन घेतलं होतं. 6 / 9रजतमुळेच क्रिकेटशी संपूर्ण कुटुंबाचं नातं जोडलं गेल्याचं त्याचे वडील सांगतात. 'रजतला लहानपणापासूनच क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. त्याचं हे वेड पाहूनच आम्ही त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आलो. वयाच्या ८ व्या वर्षीच रजत इंदौर क्रिकेट क्लबकडून खेळू लागला होता. तर वयाच्या १० वर्षी तो त्याच्या वयापेक्षाही मोठ्या खेळाडूंसोबत तो खेळत होता', असं मनोहर पाटीदार यांनी सांगितलं. 7 / 9'शाळेचा कालावधी सोडला तर रजतचं विश्व फक्त घर आणि क्रिकेट क्लब यातच होतं. त्याचा मित्र परिवार देखील अगदी मोजकाच आहे. लहानपणापासूनच तो खूप शिस्तप्रिय राहिला आहे. क्रिकेटप्रतीच्या समर्पणामुळे तो केवळ १२ वी पर्यंतंचं शिक्षण व्यवस्थित करू शकला', असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं. 8 / 9रजतचं अॅडमिशन एका स्थानिक महाविद्यालयात केलं होतं. पण परीक्षेच्या कालावधीत दुसऱ्या शहरांमध्ये रणजी करंडक स्पर्धेसाठी तो परीक्षा देऊ शकला नाही. क्रिकेटमधली त्याची चांगली कामगिरी पाहून आम्हीही कधी महाविद्यालयीन शिक्षणावर जास्त भर दिला नाही, असं मनोहर पाटीदार म्हणाले.9 / 9आपल्या मुलाला मिळालेली क्रिकेटची प्रतिभा ही दैवी देणगी असल्याचंही ते म्हणाले. 'आम्ही खूप सामान्य कुटुंबातून आले आहोत. रजतला नेहमी कोणत्याही दबावाविना खेळता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आलो. सामन्यात लवकर बाद झाल्यानंतरही आम्ही कोणतीही चिंता कधीच त्याच्यासमोर व्यक्त केली नाही. कारण त्याला नामी संधी चालून येईल यावर आमचा विश्वास होता, असंही रजतच्या वडीलांनी सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications