रणजी करंडक स्पर्धा २०२३-२४ च्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन संघ भिडणार आहेत. किताबासाठी मुंबई आणि विदर्भ यांच्यात सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्डेडियमवर १० मार्चपासून सकाळी ९.३० वाजल्यापासून हा थरार रंगेल.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा पराभव केला. तर, उपांत्य फेरीत विदर्भाने मध्य प्रदेशचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १० मार्चपासून मुंबई आणि विदर्भ यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
मुंबई आणि विदर्भाने अंतिम फेरी गाठून विक्रम केला आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात तब्बल ५३ वर्षांनंतर असे घडले की, अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ एकाच राज्यातील आहेत.
आतापर्यंत रणजी करंडकमध्ये दोनदाच असा योगायोग जुळून आला आहे. अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ एकाच राज्यातून आल्याची ही तिसरी वेळ आहे. १९७१ मध्ये प्रथमच महाराष्ट्र आणि मुंबईने अंतिम फेरी गाठली होती.
तेव्हा मुंबईने अंतिम फेरीत शानदार विजयाची नोंद केली होती. आता पुन्हा एकदा एकाच राज्यातील दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. विदर्भ आणि मुंबईच्या संघाला इतिहासात नाव नोंदवण्याची संधी आहे.
यंदाच्या हंगामातील पहिला उपांत्य सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात झाला. विदर्भाने पहिल्या डावात १७० धावा केल्या. त्यांनी खराब सुरुवातीतून सावरले आणि दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले अन् संघाने दुसऱ्या डावात ४०२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने पहिल्या डावात २५२ धावा तर दुसऱ्या डावात २५८ धावा केल्या. अशाप्रकारे विदर्भाने हा सामना ६२ धावांनी जिंकला. विदर्भाकडून यश राठोर, करुण नायर, उमेश यादव आणि यश ठाकूर यांनी चमकदार कामगिरी केली.
यंदाच्या पर्वातील दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात झाला. तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात १४६ धावांवर सर्वबाद झाला. मुंबईने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात तामिळनाडूने दुसऱ्या डावात १६२ धावा केल्या. अशा प्रकारे मुंबईने हा सामना एक डाव आणि ७० धावांनी आपल्या नावावर केला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने शतक झळकावून गोलंदाजीतही कमाल केली. शार्दुलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मुंबईला फायनलचे तिकीट मिळाले.