Ravi Shastri Reaction on Yuzvendra Chahal: Mumbai Indians मध्ये असताना युजवेंद्र चहलसोबत घडलेल्या घटनेवरून रवि शास्त्री संतापले, म्हणाले...

युजवेंद्र चहलने सांगितला होता अंगावर काटा आणणारा प्रसंग

Ravi Shastri Reaction Yuzvendra Chahal Mumbai Indians Shocking Revelations: टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने नुकताच त्याच्या आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला. मुंबई इंडियन्समध्ये असताना एका खेळाडूने मद्यधुंद अवस्थेत त्याला १५व्या मजल्यावर बाल्कनीत लटकवले होते, असं त्याने सांगितले.

मी मरण अगदी जवळून पाहिलं असं युजवेंद्र चहलने सांगितल्यानंतर सर्वच स्तरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वीरेंद्र सेहवागने चहलला त्या व्यक्तिचे नाव सांगण्यास सांगितलं.

सेहवागनंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही घडलेल्या प्रकाराबाबत मत मांडलं. अतिशय संतापलेल्या सुरात ते भयंकर घटनेवर व्यक्त झाले.

"चहलसोबत घडलेली घटना ही हसण्याची किंवा गमतीची बाब नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. असं होणं म्हणजे कोणाच्या तरी जीवाशी खेळणंच आहे. ज्याने हे केलं, तो मानसिकदृष्ट्या संतुलित नसणार", असं शास्त्री म्हणाले.

"अशा प्रकारच्या गोष्टी नव्या खेळाडूंबरोबर जर झाल्या असतील तर ती चिंतेची बाब आहे. कोणाचा तरी जीव धोक्यात टाकणं ही लोकांना मजेशीर वाटत असेल, पण मला ते खूप गंभीर वाटतं", असं शास्त्री म्हणाले.

"हे विनोदी कृत्य नाही. यावरून असे दिसून येते की जो व्यक्ती हे सर्व करत आहे, त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. जेव्हा तुम्ही असे काहीतरी करता तेव्हा चूक होण्याची दाट शक्यता असते. हे कोणत्याही स्तरावर मान्य नाही", अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला.