MS Dhoni Ravindra Jadeja, IPL 2022: "धोनीनंतर मी CSKचा कर्णधार झाल्याचा आनंदच झालाय, पण..."; मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर जाडेजाने स्पष्ट शब्दात दिली प्रतिक्रिया

MS धोनीने कर्णधारपद सोडलं असलं तरी संघात खेळणार

IPL 2022 स्पर्धा सुरू होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे कर्णधारपद सोडले. त्याने आपला वारसदार म्हणून रविंद्र जाडेजाची नेमणूक केली.

गेल्या २ वर्षांपासून धोनी निवृत्त होणार का, धोनी कर्णधारपद सोडणार का.. असे सवा उपस्थित करण्यात येत होते. त्या प्रश्नांची आज काही अंशी उत्तरं मिळाली.

IPL 2022 मध्ये आता धोनी CSKचा कर्णधार म्हणून नव्हे तर फक्त खेळाडू म्हणून वावरताना दिसणार आहे. नेतृत्वाचा भार संघाने रविंद्र जाडेजावर सोपवला आहे.

एका यशस्वी संघातील नव्या जबाबदारीबद्दल रविंद्र जाडेजाने पहिली प्रतिक्रिया दिली. संघाने आपल्याला जबाबदारी देण्यास पात्र समजलं ही गौरवाची बाब आहे असं तो म्हणाला पण त्यासोबतच त्याने एक मोठी भीती व्यक्त केली.

CSKचं कर्णधारपद मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. पण धोनीच्या जागी कर्णधार होणं ही सोपी गोष्ट नाही. धोनीने जो समृद्ध असा वारसा दिला आहे, तो योग्यपणे पुढे नेणं हे माझं कर्तव्य आहे, असं जाडेजा म्हणाला.

माझ्यावर जबाबदारी असली तरी धोनी भाई पण मैदानातच असतील. त्यामुळे मला जर कोणती समस्या उद्भवली तर मी सरळ धोनीभाईकडे जाऊन त्यांचा सल्ला घेईन. त्यामुळे जबाबदारी कठीण असली तरी चिंता करण्याचं काहीच कारण नाही, असं जाडेजाने स्पष्ट केलं.