Ravindra Jadeja : माझा क्रिकेटचा प्रवास म्हणजे दोन 'महेंद्र'च; रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा!

Ravindra Jadeja on ms dhoni : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल एक मोठे विधान केले आहे.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल एक मोठे विधान केले आहे. आपला क्रिकेट प्रवास दोन 'महेंद्र'मधला असल्याचे त्याने म्हटले आहे.

खरं तर अष्टपैलू रवींद्र जडेजाची कारकिर्द गुजरातमधील जामनगर येथून सुरू झाली. जामनगर येथील त्याचे प्रशिक्षक महेंद्रसिंग चौहान आणि भारताचा माजी आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जड्डूच्या कारकिर्दीवर मोठा प्रभाव आहे.

रवींद्र जडेजाच्या खेळीबद्दल भाष्य करायचे झाले तर, जड्डूने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भरपूर क्रिकेट खेळले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली तो भारतीय संघातच खेळला नाही, तर त्याने धोनीसोबत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्येही बराच वेळ घालवला आहे.

धोनी आणि जडेजा अनेक वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे भाग आहेत. त्यामुळे रवींद्र जडेजाने अनेकवेळा आपल्या खेळीवर महेंद्रसिंग धोनीचा खूप प्रभाव असल्याचे म्हटले आहे.

दोन 'महेंद्र'यांच्यामधील आपली कारकिर्द कशी राहिली याबाबत जड्डूने स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान भाष्य केले. तसेच माझी कारकिर्द दोन महेंद्र यांच्यातच राहिली असल्याचे मी धोनीला सांगितले आहे असेही जडेजाने सांगितले.

"मी माहीभाईला असेही सांगितले होते की, जामनगरमधील माझे प्रशिक्षक महेंद्रसिंग चौहान आणि सीएसकेमधील माझा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात माझा क्रिकेट प्रवास झाला आहे. माझा क्रिकेटचा प्रवास या दोन 'महेंद्रां'मधलाच आहे."

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डे मालिका खेळत असून जड्डू चांगल्या लयनुसार खेळत करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये उत्कृष्ट योगदान दिले.

पहिल्या वन डे सामन्यात त्याने गोलंदाजीत दोन बळी घेतले आणि मिचेल मार्शसारख्या धोकादायक फलंदाजाला बाद केले. त्याचवेळी त्याने ग्लेन मॅक्सवेलला देखील स्वस्तात बाद केले. याशिवाय कुलदीप यादवच्या चेंडूवर मार्नस लाबूशेनचा जबरदस्त झेलही टिपला.

यानंतर जडेजाने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकापाठोपाठ पाच गडी गमावले होते. मात्र, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी 108 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणले.

अष्टपैलू खेळी केल्यामुळे रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात जड्डूने 69 चेंडूत 45 धावा केल्या होत्या.