विराट कोहलीचे Qualifier 1 खेळण्याचे स्वप्न कसे साकार होणार?; RCBचे भविष्य आता CSK लिहिणार!

Can RCB enter into Qualifier 1? check scenario : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या प्ले ऑफमधील चौथ्या स्थानासाठी चुरस सुरू असताना टॉप टू मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( Royal Challengers Banglore) आज सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) विजय मिळवला असता तर ही स्पर्धा अधिक चुरशीची झाली असती.

सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४१ धावा केल्या. जेसन रॉयनं ४४, केन विलियम्सननं ३१ धावांचं योगदान दिलं. RCBकडून हर्षल पटेलनं ३, तर डॅन ख्रिस्टियननं २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात RCBकडून देवदत्त पडिक्कल ( ४१) व ग्लेन मॅक्सवेल ( ४०) यांनी दमदार खेळ केला. पण, केननं १५व्या षटकात मॅक्सवेलला धावबाद करून सामना फिरवला.

अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज असताना एबी डिव्हिलियर्सनं चार निर्धाव चेंडू खेळले अन् भुवनेश्वर कुमारनं SRH ला ४ धावांनी विजय मिळवून दिला. RCB ला ६ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. केनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आलं. मॅक्सवेलची विकेट हा टर्निंग पॉईंट ठरल्याचे विराट कोहलीनंही मान्य केलं.

आज RCBनं विजय मिळवला असता तर त्यांच्या खात्यात १८ गुण झाले असते आणि नेट रन रेटही सुधारला असता. मग अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून ते क्वालिफायर १ साठी सहज पात्र ठरू शकले असते. पण, आता त्यांना दिल्लीवर विजय मिळवावा तर लागेल, शिवाय चेन्नईच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

चेन्नई १८ गुण व +०.७३९ नेट रन रेटसह दुसऱ्या,तर बंगलोर १६ गुण व - ०.१५९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चेन्नईचा अखेरचा साखळी सामना पंजाब किंग्सविरुद्ध उद्या, तर RCBचा दिल्लीविरुद्ध परवा होईल. त्यामुळे उद्या चेन्नई जिंकल्यास विराटचे क्वालिफायर १ खेळण्याचे स्वप्नही धुळीस मिळेल.