Join us  

Rishabh Pant: रिषभ पंतच्या कारचे टायर ब्रेकनंतर २२ फुट घासत गेले, पोलीस म्हणतात 'ओव्हरस्पीडचे पुरावे नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 1:09 PM

Open in App
1 / 12

उत्तराखंडच्या नारसन बॉर्डरवर स्टार क्रिकेटर रिषभ पंतच्या कारला काल पहाटे भीषण अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. कारही काही मिनिटांत जळून खाक झाली होती. या अपघाताचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डोळ्यावर झोप आल्याने अपघात झाल्याचे रिषभ पंतने पोलिसांना सांगितले आहे.

2 / 12

पोलीस आणि आरटीओ रिषभ पंतच्या कारचा अपघात कसा झाला आणि आग कशी लागली याची चौकशी करत आहेत. रिषभच्या कारच्या अपघातावरून चर्चांचा बाजार गरम आहे. तो १५० ते २०० किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवत होता, असा दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे.

3 / 12

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार धडकताना आणि डिव्हायडरवरून उडताना दिसत आहे. तो वेग पाहून लोक हा अंदाज लावत आहेत. मात्र, कोणीही याची अधिकृत माहिती देत नाहीय. पोलिसांचे यावर वेगळेच म्हणणे आहे.

4 / 12

रिषभ पंतच्या अपघातानंतर परिवहन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली होती. अपघाताची माहिती घेतली. घटनास्थळावरील पुराव्यांवरून त्यांनी अपघात कसा झाला असेल याचा अंदाज बांधला आहे. यामध्ये रिषभने कार डिव्हायडरला आदळण्यापूर्वी ब्रेक लावल्याचे दिसत आहे.

5 / 12

कारचे टायर रस्त्यावर २२ फूट एवढ्या मोठ्या अंतरापर्यंत घासत गेल्याच्या खुना आहेत. यानंतर ही कार डिव्हायरवर जाऊन आदळली आहे. डिव्हायरचे काही पोल तोडत ही कार ही कार हवेतून पलिकडे कोसळली. यानंतर देखील ही कार ८० ते १०० मीटर घसरत गेली आहे, असे या प्राथमिक चौकशी अहवालात म्हटले आहे.

6 / 12

आरटीओ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्राथमिक तपासात कारच्या वेगाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालीले नाही. गुरुकुल नारसन ठिकाण ज्या आरटीओच्या अंडर येते त्याचे अधिकारी सुनील शर्मा यांच्या आदेशावर तांत्रिक तपास करण्यात आला. अजय कुमार शर्मा यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. याचा अहवाल आरटीओला पाठविण्यात आला आहे.

7 / 12

अजय कुमार शर्मा यांनी तयार केलेल्या प्राथमिक अहवालात घटनास्थळ आणि घटनेच्या कारणांची माहिती दिली आहे. दिल्ली-रुरकी रस्त्यावर नरसन पोलिस चौकीच्या 100 मीटर पुढे क्रश बॅरियरला आदळल्याने हा अपघात झाला. कारचे टायर, रिम, स्टेअरिंग, एक्सल, ब्रेक, एक्सलेटर, इंजिन आणि बॉडी पूर्णपणे जळालेले आढळल्याचे ते म्हणाले.

8 / 12

अपघातस्थळी 22 फुटांपर्यंत टायरच्या खुणा आढळून आल्या आहेत. क्रॅश बॅरियरचे 8 खांब आणि डिव्हायडरच्या रेलिंगमधील डिलाइनेटर आणि स्ट्रीट लाईटचा खांब तोडून कार विरुद्ध दिशेने रुरकी-दिल्ली रस्त्यावर पडल्याचे या अहवालात म्हणण्यात आले आहे.

9 / 12

अजय शर्मा यांनी सांगितले की, डिव्हायडरला धडकल्यानंतर कार उलटली तेव्हा ती 80 ते 100 मीटरपर्यंत घासत गेली. आरटीओने सांगितले की, सविस्तर तपास करून अपघाताच्या वेळी गाडीचा वेग किती होता आणि इतर कारणे शोधली जातील.

10 / 12

एसपी देहाट स्वप्ना किशोर सिंह यांनी सांगितले की, अपघाताचा कोणीही प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे कार ओव्हरस्पीड होती की नाही हे सांगणे कठीण आहे.

11 / 12

हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत पंतची कार ओव्हरस्पीड होती असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. पेट्रोल लीक झाल्याने आणि ठिणगी उडाल्याने कारला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

12 / 12

रिषभ पंतच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली आहे. गुढग्याला गंभीर दुखापत असल्याने व सूज असल्याने त्याचा एमआरआय अद्याप करण्यात आलेला नाही. त्याची लिगामेंट तुटल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. असे झाले तर पंतला बरे होण्यास एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. परंतू, पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाहीय.

टॅग्स :रिषभ पंतगुन्हेगारीअपघातपोलिस
Open in App