Rishabh Pant Accident: रिषभ पंत IPL 2023 खेळला नाही तरीही त्याला मिळणार 'इतके' कोटी, जाणून घ्या नियम

रिषभ पंतची दुखापत गंभीर असल्याने त्याच्या IPL खेळण्यावर साशंकता आहे.

Rishabh Pant Accident Updates, IPL 2023 : भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्यावर पुढील उपचार मुंबईत केले जाणार आहेत. ३० डिसेंबरला रिषभ कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर देहरादून येथे उपचार सुरू होते. रुरकीजवळ कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. देहरादूनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र BCCI व DDCA ने अद्ययावत उपचारांसाठी त्याला मुंबईला हलवले. त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर येथे उपचार केले जाणार आहेत.

टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला देहरादूनहून मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पंतला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, त्यानंतर तो IPL 2023 मध्ये खेळणं कठीण असल्याचे बोलले जात आहे. जर पंत IPL खेळला नाही तर त्याला त्याचे मानधन मिळणार का? मिळाले तरी ते कोण देणार? याचे आपण उत्तर जाणून घेऊया.

रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला १६ कोटी रुपयांसह करारबद्ध केले आहे. त्याला गेल्या वर्षी तीन वर्षांसाठी करारबद्ध करण्यात आले. पण आता जर तो ही स्पर्धा खेळू शकला नाही, तर ही रक्कम त्याला मिळेल का? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. याबद्दल नियम काय सांगतो हे जाणून घेऊया.

BCCI हे क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांमधील सर्वात श्रीमंत मंडळांपैकी एक आहे. दरवर्षी BCCI आपल्या खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर सन्मान करत असते. सुरूवातीला पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना कमी-जास्त मानधन दिले जात आहे. पण आता श्रेणीप्रमाणे पुरूष आणि महिला खेळाडूंना समान मानधन BCCI कडून दिले जाते.

असे असले तरी BCCIच्या नियमांनुसार, बोर्ड आपल्या केंद्रीय करारामध्ये (Central Contract) समाविष्ट असलेल्या खेळाडूंना विम्याची सुविधा देते. IPL पूर्वी जर हे खेळाडू जखमी झाले किंवा त्यांचा अपघात झाला तर बीसीसीआय त्यांना रक्कम देते. त्यानुसार, रिषभ पंतला नक्की किती पैसे मिळणार जाणून घेऊया.

बीसीसीआयच्या २०११ पासून लागू झालेल्या नियमानुसार, रिषभ पंतला दिल्ली संघाने १६ कोटींना करारबद्ध केले आहे. त्यामुळे रिषभ पंत जरी IPL 2023 मध्ये खेळला नाही तरी त्याला पूर्ण पैसे मिळतील. फरक एवढाच आहे की हा पैसा त्याला दिल्ली कॅपिटल्स देणार नसून BCCI देणार आहे. गेल्या वर्षी दीपक चहरलाही आयपीएल २०२२ च्या आधी दुखापत झाली होती. त्याला चेन्नई सुपरकिंग्सने १४ कोटींना विकत घेतले. रिपोर्ट्सनुसार त्याला ती संपूर्ण रक्कम BCCIकडून मिळाली.