भारताचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र त्याच्या डोक्यावर आणि पायाला जखमा झाल्या होत्या. या अपघाताबाबत कालपासून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यातच या अपघाताबाबत रिषभ पंतनेही महत्त्वाची माहिती दिली आहे.
अपघातानंतर रिषभ पंत याला रुडकी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे पंतने गाडी चालवत असताना झोप आल्याने नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे सांगितले होते. मात्र आता पंतने अपघाताबाबत थोडी वेगळी माहिती दिली आहे.
रिषभ पंतवर रुडकी येथे उपचार केल्यानंतर आता त्याच्यावर देहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे डीडीसीएच्या पदाधिकाऱ्यांनी रिषभ पंतची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यानच रिषभ पंतने डीडीसीएचे डायरेक्टर श्याम शर्मा यांना भेटून नवा दावा केला आहे. त्यानंतर श्याम शर्मा यांनी माध्यमांना ही माहिती.
श्याम शर्मा हे जेव्हा रिषभ पंतची विचारपूस करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी रिषभ पंतला हा अपघात कसा झाला, याबाबत विचारणा केली. त्यावर पंतने सांगितले की, समोर खड्डा आला होता. तो खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.
रिषभ पंतला भेटून आल्यानंतर श्याम शर्मा यांना रिषभने अपघाताचे काय कारण सांगितले? असे विचारण्यात आले. त्यावर डीडीसीएचे डायरेक्टर असलेल्या श्याम शर्मा यांनी सांगितले की, रिषभ म्हणाला, पहाटेची वेळ होती. समोर खड्ड्यासारखं काहीतरी दिसलं. तो वाचवताना हा अपघात झाला.
श्याम शर्मा यांनी पुढे सांगितले की, रिषभ पंतला एअरलिफ्ट करण्याची सध्यातरी आवश्यकता नाही आहे. त्याला सध्या दिल्लीला शिफ्ट करण्यात येणार नाही. लिगमेंट ट्रिटमेंटसाठी जर त्याला लंडनमध्ये जावं लागलं तर त्याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे.