"ती' गोष्ट आम्हाला जमली नाही, म्हणून आम्ही हरलो"; रोहित शर्माने दिली प्रामाणिक कबुली

Rohit Sharma on team India loss, Jeffrey Vandersay, IND vs SL: श्रीलंकेने बलाढ्य टीम इंडियाचा ३२ धावांनी केला सहज पराभव

यजमान श्रीलंकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला ३२ धावांनी पराभूत केले. २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक (६४) ठोकले. पण नंतर श्रीलंकेच्या जेफ्री वँडरसे याने ६ बळी घेत भारताचा डाव २०८ धावांतच गुंडाळला. श्रीलंकेने मालिकेत १-०ने आघाडी घेतल्यानंतर रोहितने प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले.

"सामन्यात परिस्थिती काय आहे ते पाहून निर्णय घ्यावे लागतात. उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांना पाठवण्याच्या निर्णय त्या पद्धतीचाच होता. पण तो आमच्यासाठी चांगला ठरला नाही. स्ट्राइक बदलण्यासाठी हा निर्णय घेतला होता, पण जेफ्री वँडरसेने केलेल्या गोलंदाजीला याचे श्रेय द्यावे लागेल. त्याने आमच्या फलंदाजांना फटके मारू दिले नाहीत आणि सहा बळी घेतले."

"श्रीलंकेने आज खूपच उत्तम क्रिकेट खेळले. मी ६५ धावांवर बाद झालो, त्याचे कारण माझ्या खेळण्याची पद्धत होती. मी जेव्हा अशा पद्धतीने खेळतो तेव्हा त्याबरोबरच अनेक प्रकारच्या जोखीम असतात. पण त्या जोखीम पत्करूनच मी खेळत असतो. मी शतक करो, अर्धशतक करो किंवा शून्यावर बाद व्होवो, बाद होण्याचं दुःख कायमच असतं. पण असे असले तरीही मी माझ्या खेळण्याची पद्धत बदलणार नाही."

दोन्हीही सलामीवीरांनी फटकेबाजीकडे लक्ष दिले, पण पुढे अपेक्षित निकाल मिळाला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही खरंच खूप चांगले क्रिकेट खेळलो आहोत. यावेळी मात्र तशा पद्धतीने खेळता आले नाही. आजच्या पराभवावर नक्कीच ड्रेसिंग रूममध्ये चर्चा होईल आणि यातून नक्कीच काहीतरी तोडगा काढला जाईल," असे रोहित म्हणाला.

"जेव्हा एखाद्या सामन्यात पराभव होतो, त्यावेळी सामन्यातला एखादा ठराविक टप्पा नाही; तर प्रत्येक गोष्ट मनाला लागते. जर सामने जिंकायचे असतील तर खेळाडूंना आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखणे अतिशय आवश्यक आहे. तीच गोष्ट आमच्या खेळामध्ये आज दिसली नाही. आजच्या पराभवाचे दुःख आहे. पण अशा गोष्टी होत राहतात."

"मधल्या टप्प्यात बॅटिंग करणे कठीण होते म्हणून पॉवर-प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यावर आमचा भर होता. खेळपट्टी कशा पद्धतीची आहे याचा आमच्या फलंदाजांना फारसा अंदाज आला नाही. खेळ ज्या पद्धतीने पुढे गेला, त्याचाही अंदाज घेणे आम्हाला जमले नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही, म्हणूनच आमचा पराभव झाला"