Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या पाचव्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रामाणिक कबुली; म्हणाला, "आता आम्हाला कळून चुकलंय की..."

"आज हारलोय, आता पुढच्या वेळी आम्हाला...."

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील सलग पाचव्या सामन्यात पराभव झाला. पंजाब किंग्जने त्यांना १२ धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या.

"आजच्या सामन्यात मुंबईसाठी नकारात्मक गोष्टी कोणत्याच नव्हत्या. आम्ही खूप चांगले खेळलो. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लक्ष्याच्या खूप जवळही आलो. फक्त दोन रन आऊटचा आम्हाला फटका बसला."

"आज आम्ही एका वेगळ्या विचारसरणीने खेळलो. पण त्याचा आमच्या संघाला म्हणावा तसा फायदा झाला नाही. आम्ही पराभूत झालो असलो तरीही सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा यांच्यासारख्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांचे कौतुक करायलाच हवे."

"सुरूवातीच्या षटकांमध्ये आमच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत धावगती चांगली राखली होती. पण पंजाबच्या गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकात चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला रोखण्यात त्यांना यश आले. याचे त्यांना श्रेय द्यायला हवे"

"आम्ही चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळत नाहीये हे आता आम्हाला कळून चुकलंय. त्यामुळे खेळाडूंनी सामन्याची परिस्थिती बघून त्याप्रमाणे खेळायला हवे आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे वागायला हवे", अशी चूक रोहितने सर्वांच्याच निदर्शनास आणून दिली.

"पंजाबच्या संघाने दमदार सुरूवात केली. त्यांनी आमच्या गोलंदाजांवर दडपण आणले. पण पिच खूप चांगले होते त्यामुळे १९८ धावा आम्हाला करता येणे शक्य होते. पण मी आधी म्हटल्याप्रमाणेच आता आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये जाऊन अजून चांगली तयारी करावी लागेल आणि मगच मैदानात उतरावे लागेल", असे रोहित म्हणाला.